नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात दुपारी २ वाजेपर्यंत ३८.८८ टक्के मतदान गडचिरोलीत

सर्वाधिक ४६.५१ टक्के, तर नागपुरात ३६.१३ टक्के; भंडारा ३६.८५ टक्के मतदान

मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत विभागातील सहा जिल्ह्यांत एकूण ९९ हजार ३७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही एकूण मतदानाची टक्केवारी ३८.८८ टक्के आहे. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ४६.५१ टक्के, तर नागपूर जिल्ह्यात ३६.१३ टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी येण्यास रात्री उशीर होणार आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात आलेली पूर्वतयारी आणि सुरक्षा व्यवस्थेमुळे मतदान प्रक्रिया सुरळीत चालू आहे. भंडारा येथील पीएमसी लालबहादूर शास्त्री, नगरपरिषद गांधी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय जेसीस कॉन्व्हेंट येथे उत्साही वातावरणात मतदान सुरू आहे.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात एकूण २ लाख ५५ हजार ६०३ मतदार आहेत. यामध्ये १ लाख ४७ हजार २८० पुरुष, १ लाख ८ हजार ३०१ महिला आणि २२ इतर मतदारांचा समावेश आहे. दुपारी २ वाजेपर्यंत एकूण ९९ हजार ३७८ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ६३ हजार १८७ पुरुष आणि ३६ हजार १९१ महिलांचा समावेश आहे. इतर प्रवर्गातील मतदारांचे मतदान नोंदविण्यात आले आहे.

भंडारा जिल्ह्यात एकूण २१ हजार ३४९ मतदारांपैकी ७ हजार ८६८ मतदारांनी केले. यामध्ये ५ हजार ३०८ पुरुष आणि २ हजार ५६० महिला मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात ३६.८५ टक्के मतदान झाले.

गोंदिया जिल्ह्यात एकूण २२ हजार १७६ मतदारांपैकी ९ हजार १७१ मतदारांनी मतदान केले. यामध्ये ५ हजार १४६ पुरुष आणि ३ हजार २२५ महिला मतदारांचा समावेश असून, मतदानाची टक्केवारी ४१.३६ आहे. संपूर्ण मतदान प्रक्रिया दरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *