ऊर्जित खेडकरची बॅडमिंटनमध्ये चमक; सलंग दुसऱ्यांदा प्रथम मानांकन
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अलवर येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या ऊर्जित आशीष खेडकर याने बॅडमिंटनमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयूएचएस) बॅडमिंटन निवड चाचणीत त्याने सलग दुसऱ्यांदा प्रथम मानांकन मिळवले.
या यशामुळे ऊर्जितची अखिल भारतीय विद्यापीठ संघटनेच्या (एआययू) पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धा २०२६-२७ साठी निवड झाली आहे. राजस्थानमधील अलवर येथे होणाऱ्या या स्पर्धेत तो महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
ऊर्जितचे वडील आशीष खेडकर हे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू आहेत. ते भंडारा येथे बॅडमिंटन प्रशिक्षण, पिकल बॉल प्रशिक्षण तसेच क्रीडा अकादमी चालवितात. वडिलांकडून मिळालेले मार्गदर्शन आणि स्वतःच्या मेहनततीच्या बळावर ऊर्जितने हे यश संपादन केले.
त्याच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, कुटुंबीय आणि भंडारा येथील क्रीडा क्षेत्रातील खेळाडू व मान्यवरांनी अभिनंदन करून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.








