भंडारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; साकोली तालुक्यातील खैरी/वलमाझरी ग्रामपंचायतचा देशात दुसरा क्रमांक*

*हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार
काशिनाथ ढोमणे
भंडारा :- भंडारा जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद व गौरवास्पद बातमी समोर आली आहे. केंद्र शासनाच्या पंचायती राज मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२६ अंतर्गत ‘क्लायमेट अॅक्शन स्पेशल पंचायत पुरस्कार (हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार) या विशेष श्रेणीत साकोली तालुक्यातील ग्रामपंचायत खैरीवालमाझरीने संपूर्ण देशात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशाने भंडारा जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.
ग्रामपंचायतला ७५ लाख रुपयाचे बक्षिस मिळणार आहे. ही रक्कम पुढील पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी वापरली जाणार आहे. खैरी वलमाझरी ही साकोली तालुक्यातील निसर्गरम्य आणि आदर्श ग्रामपंचायत ही. नागझिरा वन्यजीव अभयारण्याच्य पायथ्याशी वसलेली आहे.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षण, हरित विकास, अक्षय ऊर्जा वापर, पाणी संवर्धन व हवामानपूरक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी ‘क्लायमेट अॅक्शन स्पेशल पंचायत पुरस्कार दिला जातो. या श्रेणीत संपूर्ण देशातून केवळ तीन पंचायतींची निवड केली जाते. त्यामध्ये खैरीवालमाझरीने दुसरा क्रमांक मिळवणे ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.

सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, तांत्रिक अधिकारी, कर्मचारी व गावातील प्रत्येक ग्रामस्थाच्या एकत्रित प्रयत्नांतून हे शक्य झाले. गेल्या दोन वर्षांत ग्रामपंचायतीने राबवलेले उपक्रम उल्लेखनीय आहेत. गावात जलसंधारण अंतर्गत शेततळी, गावतलाव खोलीकरण, शोषखड्डे, हरित ऊर्जा अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय, शाळा व अंगणवाड्यांवर सौर पॅनल, ८०% पथदिवे सौरऊर्जेवर, ‘एक व्यक्ती एक झाड’ मोहिमेतून झाडांची लागवड व ९०१४ जगवणूक, १००% घरातून ओला-सुका कचरा विलगीकरण, गांडूळखत प्रकल्प, शाळा-महाविद्यालयांमध्ये हवामान बदल जनजागृती शिबिरे, महिला बचत गटांच्या माध्यमातून कापडी पिशवी चळवळ राबविण्यात येत आहेत.
खैरीवालमाझरीच्यां या यशामुळे भंडारा जिल्ह्यातील इतर ५४३ ग्रामपंचायतींना हवामानपूरक काम करण्यासाठी नवी ऊर्जा मिळाली आहे. जिल्हा प्रशासनाने २०२७ पर्यंत २० गावे ‘हरित व हवामानसक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.









