डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरवरील हल्ल्याचा निषेध
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हिंसक हल्ल्याच्या घटनेचा नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (एन.आय.एम.ए.) च्या भंडारा जिल्हा शाखेने तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा अधिक कडक करावा, या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी साकोली यांचेमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन पाठविले आहे.
एन.आय.एम.ए. ही संपूर्ण देशभरात तसेच महाराष्ट्रात लाखो आय.एस.एम. पदवीधारक आयुर्वेद व युनानी डॉक्टरांचे नेतृत्व करणारी ७८ वर्षांपासून कार्यरत असलेली सर्वात मोठी, जुनी व राष्ट्रव्यापी नोंदणीकृत संघटना आहे. मागण्यात शास्त्रीनगर हल्ला प्रकरणी आरोपींवर तातडीने व निष्पक्ष कारवाई करावी. राजकीय पाठबळ, हस्तक्षेप किंवा दोषींना संरक्षण देण्याचा कोणताही प्रयत्न थांबवावा.
महाराष्ट्र मेडिकल सेवा व्यक्ती व मेडिकेअर सेवा संस्था हिंसाचार व मालमत्ता आणि प्रतिबंधक अधिनियम २०१० मध्ये तात्काळ प्रभावी सुधारणा करून त्याचा प्रत्यक्ष वापर व्हावा. अशा घटनेत एफ.आय.आर. नोंदणी, गंभीर हल्ला व शस्त्रांच्या वापरासंबंधी गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र करणे, ३ किंवा ६० दिवसात तपास पूर्ण करणे, जलद गती न्यायालयात खटल्याचा निकाल आणि नुकसान भरपाई वसुलीची प्रभावी तरतूद करावी. आरोग्य संस्थांमधील राजकीय हस्तक्षेप, धमक्या, दडपशाही, दहशतीचे वातावरण यास तात्काळ प्रतिबंध घालावा. रुग्णालय हे उपचाराचे स्थळ असून तेथे कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव, बेकायदेशीर हस्तक्षेप व गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, याची शासनाने हमी घ्यावी. सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात चोवीस तास प्रशिक्षित सुरक्षा व्यवस्था, प्रवेश नियंत्रण, सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, पोलीस समन्वयक आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा निर्माण करावी. Zero Tolerance against Healthcare Violence धोरणाची प्रभावी अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करावी.
केंद्रीय कठोर कायदा तातडीने लागू करावा. डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांना सुरक्षित, सन्मानजनक व निर्भय वातावरणात सेवा देण्याची हमी द्यावी. या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा सर्व वैद्यकीय संघटना एकत्र येऊन राज्यव्यापी आंदोलन करतील आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर एन. आय. एम. एम. चे जिल्हा अध्यक्ष डॉ. रुपेश चंद्रवंशी यांच्यासह डॉ. राजेश चांदवाणी, डॉ. नितीन गुप्ता, डॉ. गणेश फुस्टोडे, डॉ. तुषार मस्के, डॉ. निलाद गोबाडे, डॉ. मारोती बोरकर, डॉ. दिपू चांदवाणी, डॉ. केशव कापगते, डॉ. भास्कर कापगते, डॉ. अतुल दोनोडे, डॉ. नितीन बोरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.








