भंडारा येथे दोन दिवसीय थिएटर कार्यशाळेचे उद्घाटन थाटात
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा : आजच्या तरुण पिढीमध्ये संगीत, नृत्य, नाट्य, चित्रपट निर्मिती तसेच यूट्यूब व डिजिटल माध्यमांबाबत विशेष आकर्षण निर्माण होत आहे. आधुनिक युगात मनोरंजन क्षेत्रातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत असल्याने युवक-युवतींना या क्षेत्राची ओळख व प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने कलापथक टीम भंडारा च्या वतीने सार्वजनिक वाचनालयाच्या इंद्रराज सभागृहात दोन दिवसीय थिएटर कार्यशाळेचे (वर्कशॉपचे) उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
थिएटर कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष धनंजय दलाल, नगर परिषद भंडाराच्या नगराध्यक्ष मधुरा मदनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत, भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, नगरसेविका लक्ष्मी भागवत, नंदगोपाल फाउंडेशनचे संस्थापक उपाध्यक्ष डॉ. यशवंत लांजेवार, महिला अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा चांदेकर, सामाजिक कार्यकर्त्या मेधा भागवत, डॉ. ओमप्रकाश गि-हेपुंजे, डॉ. आशिष सावरकर (ब्लेस हॉस्पिटल, मौदा), पोलीस विभागातील सुरेंद्र राऊत, नगरसेवक नितीन गायधने, कॅप्टन विनोद गबरे, डॉ. तन्नू गबरे, हैदराबाद फिल्म सिटी येथील तज्ज्ञ व सुप्रसिद्ध सिनेकर्ते तसेच पुष्पा-१ व पुष्पा-२ चित्रपटांचे कोरिओग्राफर सागर चव्हाण, भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, कोरिओग्राफर व मीडिया उद्योजक हनी खट्टर, सुप्रसिद्ध डान्स ट्रेनर व एडिटर दीप अंबुले, डीओपी सिनेमॅटोग्राफर रोहित दुधबर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन, नटराज पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. विशेष अतिथी म्हणून भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर, सुप्रसिद्ध ॲंकर परेश, मोहित जगणे तसेच जिद्दी कलाकार टीमचे सदस्य उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये चित्रपट क्षेत्रातील करिअरच्या संधी, ऑडिशन प्रक्रिया व तयारी, हिंदी स्क्रिप्ट, ॲक्टिंग, सेल्स मॅन, मेडिटेशन, चाय की टपरी यांसारख्या विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष कृतीतून आपल्यातील कलाकार जागृत केला आहे, असे मार्मिक मत भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, कोरिओग्राफर व मीडिया उद्योजक हनी खट्टर यांनी व्यक्त केले.
तसेच कॅमेरा, साऊंड व लाईटचे मूलभूत ज्ञान, व्हिडिओ एडिटिंग, नृत्य दिग्दर्शन (कोरिओग्राफी), ड्रेसिंग व नेपथ्य वापर, मेकअप तंत्र आदी विषयांवर हैदराबाद फिल्म सिटी येथील तज्ज्ञ व सुप्रसिद्ध सिनेकर्ते सागर चव्हाण (चित्रपट पुष्पा-१ व पुष्पा-२ चे कोरिओग्राफर) तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रशिक्षण व सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटी त्यांनी विविध डान्स स्टेप्स शिकविल्या आणि सर्व सहभागी दोन गाण्यांच्या तालावर उत्स्फूर्तपणे नृत्य केले. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील नवोदित कलाकारांमध्ये एक नवी उर्मी आणि आत्मविश्वास पाहावयास मिळाला. जिल्ह्यातील युवक-युवतींनी थिएटर वर्कशॉपमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत कार्यशाळेचा मनसोक्त आनंद लुटला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध प्रेरणादायी उदाहरणांद्वारे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिष्म लांडगे यांनी केले, तर प्रास्ताविक कलापथक टीम भंडाराचे संचालक सुरेंद्र कूलरकर यांनी केले. उपस्थितांचे आभार कलापथक टीम भंडाराचे मार्गदर्शक विलास के सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुस्कान सय्यद, मोरेश्वर समरीत, शरद धोतरे, आस्तिक उके, अनुष्का चव्हाण, तेजस्विनी डोंगरे, ईश्वया डीब्बे, श्रावणी पवार, केतन काटेखाये, मयुर प्रधान, गणेश निंभारते, तन्मय तितीरमारे, पीयूष गबरे तसेच कलापथक टीम भंडाराचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सार्वजनिक वाचनालयातील कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.








