काँग्रेसच्या वतीने १५ मे रोजी कारधा येथे जलसमाधी आंदोलन
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे शासनाचे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांचे हाल, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आणि मूलभूत सुविधांचा अभाव याविरोधात भंडारा व गोंदिया जिल्हा काँग्रेसच्यावतीने दिनांक १५ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता कारधा चौक, भंडारा येथे “जलसमाधी आंदोलन’ आयोजित करण्यात आले असल्याची माहिती खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी आज विश्राम भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी खा. डॉ. प्रशांत पडोळे म्हणाले, जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, सिंचन प्रकल्प रखडले आहेत, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे,गावोगावी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न गंभीर आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाच्या उदासीनतेचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात एम.डी., गांजा व इतर अमली पदार्थांची वाढती तस्करी आणि त्यामध्ये अडकत चाललेली युवकांची पिढी ही अत्यंत चिंतेची बाब आहे.अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे.
मात्र याकडे शासन आणि संबंधित यंत्रणा गांभीर्याने लक्ष देताना दिसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी काँगे्रसचे भंडारा जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, जि. प. अध्यक्षा कविता उईके, सभापती शितल राऊत, नरेश ईश्वरकर, जि. प. सदस्य देवा इलमे, स्वाती वाघाये, मनिषा निंबार्ते, सरिता कापसे, विद्याकुंभारे, पूजा हजारे, संगीता नवघरे, नारायण वरठे, रमेश पारधी, प्रेम वनवे, भंडारा शहर अध्यक्ष धनराज साठवणे, काम्युनिष्ट पार्टीचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.









