पाणी मागण्याच्या बहाण्याने ट्रकचालकावर हल्ला; ३० टनांहून अधिक तांदळासह ट्रक लंपास
रावणवाडी हद्दीतील धक्कादायक घटना; चालकाला बांधून चौघांचा पलायन, सीसीटीव्हीच्या आधारे तपास वेगात
दै. लोकजन वृत्तसेवा
गोंदिया: राष्ट्रीय महामार्गावर मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पाणी मागण्याच्या बहाणा करून ट्रकचालकावर चाकूकडे करत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर हातपाय बांधून बंधक बनवत सुमारे ३० टन ७६५ किलो तांदळाने भरलेला टाटा कंपनीचा ट्रक लंपास करण्यात आला. या प्रकरणी चार अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन श्रीरामचंद्र मौर्य (वय ३५, रा. हनुमानगंज, कतवारपूर, जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश) हे मध्य प्रदेशातील चाकघाट येथून तांदूळ भरून सडक अर्जुनीकडे ट्रक घेऊन निघाले होते. १७ जुलैच्या पहाटे सुमारे चार वाजता सावरी बस स्थानकाजवळ त्यांनी विश्रांतीसाठी ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. याच शांततेचा फायदा घेत एक अनोळखी इसम ट्रकलवळ आला आणि पिण्यासाठी पाणी मागितले.
मानवी संवेदनांना साद घालत चालकाने त्याला पाण्याची बाटली दिली; मात्र पुढच्याच क्षणी विश्वासघाताचे भयावह रूप समोर आले. आरोपीने अचानक चाकू काढून ट्रकच्या खिडकीवर वार केला. या हल्ल्यात चालकाच्या हाताच्या बोटांना व अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. त्याचवेळी दुसऱ्या आरोपीने दुसऱ्या बाजूचा दरवाजा उघडून केबिनमध्ये प्रवेश केला आणि चालकाला खाली फेकले. डोक्याला मार लागून तो जखमी झाला. काही क्षणांत आणखी दोघे साथीदार तिथे दाखल झाले. चौघांनी मिळून चालकाला बेदम मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी देत त्याचे हातपाय बांधले आणि तांदळाने भरलेला ट्रक घेऊन पसार झाले.
घटनेनंतर जखमी अवस्थेत चालकाने रावणवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यावरून अपराध क्रमांक ३७१/२०२६ अंतर्गत बीएनएस कलम ३०९(४), ११८(१), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही चित्रफिती, तांत्रिक पुरावे, टोल नाक्यांवरील नोंदी आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ही घटना केवळ एका ट्रक लुटीपुरती मर्यादित नसून, महामार्गावरील मालवाहतूक सुरक्षे समोरील वाढत्या आव्हानांची तीव्र जाणीव करून देणारी आहे. अशा संघटित गुन्हेगारीवर वेळीच अंकुश ठेवणे आणि चालकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी यंत्रणा उभारणे, ही काळाची गरज असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.








