गणेशनगर ते छोटा गोंदिया… अस्वलाच्या वावराने शहरात खळबळ; वन विभागाच्यासंयमी बचावमोहीमेला अखेर यश
दै.लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- शहराच्या उपनगरात वन्यजीवांच्या वाढत्या वावराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गणेशनगरलगतच्या गौरीनगर परिसरात मध्यरात्री दिसलेल्या अस्वलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दाट झाडी, मुसळधार पाऊस आणि अंधार यामुळे वन विभागाच्या बचाव मोहीमेला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. मात्र जवळपास रात्रभर सुरू असलेल्या शोधमोहीमेनंतर शुक्रवारी सकाळी अस्वल छोटा गोंदिया परिसरातील शास्त्री चौक व लघु पाटबंधारे विभागाच्या आवारात दिसून आले.
त्यानंतर वन विभागाने नियोजनबद्ध कारवाई करत अस्वलाला कोणतीही इजा न पोहोचविता सुरक्षितपणे जेरबंद केले. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. वन विभागाच्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी आरटीओ कार्यालयामागील नाल्याजवळ प्रथम अस्वलाचा वावर आढळला होता. त्यानंतर ते संजय नगरमार्गे गणेशनगर परिसरात पोहोचले. गुरुवारी रात्री सुमारे दहा वाजता गौरीनगरमधील नागरिकांनी अस्वल पाहिल्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली. अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले; मात्र सततचा पाऊस, चिखल आणि दाट झुडपांमुळे अस्वलाचा अचूक माग काढणे कठीण ठरले. शुक्रवारी पहाटेपासून शोधमोहीमेला पुन्हा वेग देण्यात आला.
दरम्यान, अस्वल छोटा गोंदिया परिसरात दाखल झाल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. गर्दीमुळे परिस्थिती अधिक संवेदनशील बनली होती. सकाळी सुमारे साडेनऊच्या सुमारास वन विभागाच्या पथकाने विशेष उपकरणे आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या मदतीने काळजीपूर्वक रेस्क्यू ऑपरेशन राबवून अस्वलाला सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात पकडले. या संपूर्ण कारवाईत कोणतीही जीवितहानी किंवा अप्रिय घटना घडली नाही. उपवनसंरक्षक दिलीप धांडे यांनी नागरिकांना वन्यप्राणी दिसल्यास त्याच्या जवळ जाणे, छायाचित्रणासाठी गर्दी करणे किंवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न टाळण्याचे आवाहन केले.
अशा वेळी तातडीने वन विभागाला माहिती देणे हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पकडलेल्या अस्वलाची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. विशेष म्हणजे, याच गणेशनगर परिसरात यापूर्वीही अस्वल शिरल्याची घटना घडली होती. त्यामुळे शहरालगतच्या वनक्षेत्रांवरील वाढता मानवी दबाव, अधिवासातील बदल आणि अन्न-पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांचे नागरी वस्तीकडे वाढते स्थलांतर ही चिंतेची बाब ठरत आहे. वन्यजीव संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षितता यांचा समतोल राखण्यासाठी सीमावर्ती भागात अधिक प्रभावी देखरेख, जनजागृती आणि त्वरित प्रतिसाद यंत्रणा उभारण्याची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित केली आहे.








