मोहाडी नगरपंचायतीकडून २३ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

तृप्ती हातेल ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

दै. लोकजन वृत्तसेवा
मोहाडी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नागपूर विभागीय दहावी-बारावी प्रमाणपत्र परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या मोहाडी नगरपंचायत हद्दीतील २३ गुणवंत विद्यार्थ्यांचा नगरपंचायतीच्या वतीने शुक्रवारी (दि. १७) नगरपंचायत सभागृहात आयोजित विशेष सत्कार समारंभात गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष छाया डेकाटे होत्या. उपाध्यक्ष सचिन गायधने, नगरसेविका वंदना कृष्णा पराते, सविता विलास साठवणे, प्रा. नरेंद्र गायधने आणि यशवंत थोते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी सरस्वती महिला कनिष्ठ महाविद्यालय, रोहा येथील कु. तृप्ती विलास हातेल हिने बारावी विज्ञान शाखेत मोहाडी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. तसेच श्री गुरुदेव चिंतामण बिसने विद्यालय येथील कशिश कैलास मोहपुरे, ज्योत्स्ना मोतीलाल मते यांच्यासह एकूण २३ गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखापाल मिथिलेश जाधव यांनी केले. सूत्रसंचालन दिशा दिनेश निमकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन नगरसेविका देवश्री विजय शहारे यांनी मानले. या सत्कार समारंभातून विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा देण्याचा नगरपंचायतीचा उपक्रम कौतुकास्पद ठरला. उपस्थितांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *