तुमसरमध्ये गांजा तस्करीवर पोलिसांची धडक कारवाई; २.७७० किलो गांजासह २.०९ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
तुमसर, दि. ९ नोव्हेंबर : तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजाची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पहाटे धडक कारवाई करत दोन तस्करांना अटक केली आहे. या कारवाईत २.७७० किलोग्रॅम गांजासह मोपेड आणि दोन मोबाईल असा एकूण २,०९,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आज, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास खापा मांगली येथे सापळा रचून छापा टाकण्यात आला. या वेळी संशयितांकडून गांजा जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अक्षय नागसेन गजभिये, वय २७ वर्षे, आणि आर्यन चोपराम मेश्राम, वय २१ वर्षे, दोघेही राहणार परसोडी / जवाहरनगर, तालुका-जिल्हा भंडारा, अशी आहेत.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात कागदी कंटेनरसह २.७७० किलोग्रॅम गांजा असून त्यातील निव्वळ गांजाचे वजन २.६८५ किलोग्रॅम आहे. प्रति किलो ५०,००० रुपये प्रमाणे गांजाची किंमत १,३४,२५० रुपये आहे. याशिवाय सुझुकी कंपनीची बर्गमॅन मोपेड, क्रमांक एम.एच.-३६ ए.पी.-२५२३, किंमत ६०,००० रुपये, एक निळ्या रंगाचा विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल, किंमत ५,००० रुपये, आणि एक सिल्व्हर रंगाचा विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल, किंमत १०,००० रुपये, असा एकूण २,०९,२५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ११०८/२०२६, कलम ८ (क), २० (ब) II (ब), २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेण्यात आले आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून गांजाचा स्रोत, पुरवठादार, विक्री साखळी तसेच इतर संबंधित व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहायक पोलीस अधीक्षक तेजस सारडा, अतिरिक्त कार्यभार उपविभाग तुमसर, आणि तुमसर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर घोडेस्वार, पोलीस शिपाई अजय बावणे, निखील बिसने, राजू गिरेपुंजे आणि महेश नैताम यांनी सक्रिय सहभाग घेतला.
अमली पदार्थांची अवैध विक्री, वाहतूक व सेवन याविरुद्ध पोलीस विभागाकडून कठोर कारवाई सुरू असून नागरिकांनी अशा अवैध कृत्यांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.








