लक्ष्मी पूजेच्या वाघाच्या हल्ल्यातील शेतकऱ्यांचा मृत्यू
वाघाला पकडण्यासाठी पिंजरा व शूटर चमू तैनात
साकोली : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी साकोली तालुक्यातील बाम्हणी गावात दुःखाचा डोंगर कोसळला. आई-वडिलांसोबत शेतात धान कापणीचे काम करीत असलेल्या २६ वर्षीय विशाल कैलाश उईके याच्यावर अचानक वाघाने हल्ला केला. आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत वाघाने विशालला सुमारे २० फूट फरफटत नेले. त्याला वाचविण्यासाठी आई-वडिलांनी आरडाओरड करीत आटोकाट प्रयत्न केले; मात्र वाघाच्या हल्ल्यात विशाल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने लाखनी येथे आणि त्यानंतर भंडारा येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. या घटनेमुळे बाम्हणीसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दिवाळीच्या सणावर शोककळा पसरली आहे.
आई-वडिलांसोबत धान कापणी करीत असताना काळाचा घाला
प्राप्त माहितीनुसार, बाम्हणी येथील रहिवासी कैलाश उईके हे पत्नी कविता आणि मुलगा विशाल याच्यासोबत आपल्या सुमारे एक एकर शेतात धान कापणीचे काम करीत होते. सध्या परिसरात धान कापणीचा हंगाम सुरू असल्याने शेतशिवारात शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. दरम्यान, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजताच्या सुमारास अचानक वाघाने विशालवर झडप घातली.
अचानक झालेल्या या हल्ल्याने शेतात एकच गोंधळ उडाला. मुलावर वाघाने हल्ला केल्याचे पाहून आई-वडिलांनी आरडाओरड करीत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाघाने विशालला सोडले नाही. त्याला सुमारे २० फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. या हल्ल्यात विशाल गंभीर जखमी झाला. आपल्या मुलाला डोळ्यांदेखत वाघाच्या तावडीत सापडलेले पाहून आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
लाखनी ते भंडारा उपचारासाठी धावपळ; अखेर मृत्यूशी झुंज अपयशी
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विशालला कुटुंबीयांनी तातडीने लाखनी येथे उपचारासाठी नेले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला भंडारा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. विशाल कैलाश उईके (वय २६, रा. बाम्हणी) याच्या अकाली मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने उईके कुटुंबाचा दिवाळीचा आनंद क्षणात हिरावून घेतला.
वाघाला पकडण्यासाठी पिंजरा; शूटर चमूही तैनात
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे एसीएफ संजय मेंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय आणि क्षेत्र सहाय्यक राजू मेश्राम हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. संबंधित वाघाला पकडण्यासाठी घटनास्थळी पिंजरा लावण्याची कार्यवाही करण्यात आली असून, शूटर चमूच्या माध्यमातूनही आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाचे पथक प्रयत्नशील आहे.
कुटुंबीयांना दहा लाखांचा धनादेश; उर्वरित १५ लाखांची एफडी देणार
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मृतक विशालच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. शासनाच्या नियमानुसार कुटुंबीयांना दहा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला असून, उर्वरित १५ लाख रुपयांची रक्कम कुटुंबीयांच्या नावे मुदतठेव (एफडी) स्वरूपात लवकरच देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी केलेल्या विविध मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. यासंदर्भात ग्रामस्थांनी वनविभागाकडे निवेदन सादर केले असून, अधिकाऱ्यांनी ते स्वीकारले आहे.
धान कापणी करायची की जीव वाचवायचा? शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न
सध्या धान कापणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी, शेतमजूर आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणात शेतशिवारात काम करीत आहेत. मात्र जंगलालगतच्या गावांमध्ये वाघासह इतर हिंस्र वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याने शेतात जाणेही धोकादायक बनले आहे. शेती करायची की स्वतःचा जीव वाचवायचा, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांचे बळी जात असताना केवळ घटनेनंतर पंचनामा, पिंजरा आणि आर्थिक मदतीची घोषणा करून हा प्रश्न सुटणार नाही. संवेदनशील गावांमध्ये नियमित वनगस्त, वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा, शेतकऱ्यांना वेळेत पूर्वसूचना आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने बचावकार्य करण्यासाठी सक्षम व्यवस्था उभारण्याची गरज आहे.
वन्यप्राण्यांचे संरक्षण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांच्या जीविताचे संरक्षणही महत्त्वाचे आहे. बाम्हणी येथील विशालच्या मृत्यूने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, वनविभागाने केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर न थांबता ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
सध्या धान कापणीच्या हंगाम सुरू असल्याने शेतकरी आपल्या शेतात व्यस्त असतात त्यामुळे शेतात असताना शेतकऱ्यांनी सांभाळून व सुरक्षित राहून शेतीचे कामे करावी जंगल परिसरातील शेत शिवारात एकट्याने जाऊ नये नागरिकांनी संयम ठेवून वन विभागाला सहकार्य करावे.
– नितेश धनविजय
वन परिक्षेत्र अधिकारी लाखनी








