तीन दिवसांत तीन माता मृत्यू; चौकशी समिती गठित; बाई गंगाबाई रुग्णालयातील उपचार व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

उपचारातील हलगर्जी की रेफर करण्यात विलंब? आणखी एका गर्भवतीचा खासगी रुग्णालयात मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा

गोंदिया :- बाई गंगाबाई महिला रुग्णालयात अवघ्या तीन दिवसांत तीन बाळंतिणींचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी तीन सदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिगंबर मरसकोल्हे, डॉ. सोनाली भगत आणि डॉ. मोनू शर्मा यांचा समितीत समावेश असून, तिन्ही मातांच्या मृत्यूची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

२० ते २२ सप्टेंबरदरम्यान तीन मृत्यू

२० सप्टेंबर रोजी गोंडीटोला (चिवारी) येथील पूजा राकेश फरकंडे (२४), २१ सप्टेंबर रोजी तिरोडा तालुक्यातील काचेवानी येथील नाजुक रिवाज शाह (२५) आणि २२ सप्टेंबर रोजी नवेगावबांध येथील कोमल सतीश गजबे (२४) यांचा मृत्यू झाला. सलग तीन दिवस तीन मातांचा मृत्यू झाल्याने रुग्णालयातील प्रसूतीसेवा, उपचारांची कार्यपद्धती आणि गंभीर रुग्णांच्या व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या मृत्यूंमागे उपचारातील हलगर्जीपणा आहे की गुंतागुंतीची वैद्यकीय कारणे, हे चौकशी अहवालातून स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा इतर शासकीय आरोग्य संस्थांमधून गंभीर अवस्थेतील गर्भवतींना बीजीडब्ल्यू रुग्णालयात दाखल केले जाते. काही प्रकरणांत प्रकृती गंभीर झाल्यानंतरच रुग्णांना पुढील उपचारासाठी रेफर केले जात असल्याच्या चर्चेलाही चौकशीमुळे दिशा मिळणार आहे.

खासगी रुग्णालयातही आणखी एका गर्भवतीचा मृत्यू

दरम्यान, आणखी एका गर्भवतीच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. तिरोडा तालुक्यातील ठाणेगाव येथील सलमा रवींद्र शहारे (२८) यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याने २३ सप्टेंबर रोजी कुडवा नाका येथील पटले मल्टीसिटी अँड चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रथमोपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रेफर करण्यात आले. नातेवाइकांनी २४ सप्टेंबर रोजी दुपारी २.४१ वाजता त्यांना बजाज हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच २.५० वाजता त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला असून, गोंदिया शहर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

आता चौकशी अहवालाकडे लक्ष

सलग मातामृत्यूंच्या पार्श्वभूमीवर गठित समितीच्या अहवालातून मृत्यूची वैद्यकीय कारणे, उपचारांची वेळ, रेफरल प्रक्रिया आणि रुग्णालयातील व्यवस्थापनातील त्रुटी याबाबत नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या चौकशीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *