भरधाव ट्रकची कारला मागून धडक: १३ वर्षीय बालिकेसह दोघांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर

विरली बुज. येथील बेदरे कुटुंबावर काळाचा घाला

दै. लोकजन वृत्तसेवा

लाखांदूर :- भरधाव ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिल्याने १३ वर्षीय मुलीसह दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन गंभीर व चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. श्रावणी हिमेश बेदरे (वय १३, रा. विरली बुज., ता. लाखांदूर) व नितीन भर्रे (वय ३५, रा. बोंडेगाव, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर) असे मृताचे नाव आहे. ही घटना दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, विरली बुद्रुक येथील हिमेश बेदरे कुटुंबियांसह बल्लारशहा येथे चारचाकी वाहनाने काही कामानिमित्त गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत बोंडेगाव येथील भर्रे कुटुंबिय सुद्धा होते. काम आटोपून व चंद्रपूर येथील गणपतीपुढील देखावे व दर्शन घेऊन ते ब्रह्मपुरीच्या दिशेने परत येत होते. त्यांनी हॉटेलमध्येच जेवण केले. परत येत असतांना चेहऱ्यावर पाणी मारण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या कडेला आपले वाहन थांबविले. दरम्यान भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला मागेहून जबर धडक दिली धडक इतकी भीषण होती कि कारचा चुराडा झाला.

या अपघातात श्रावणी बेदरे व नितीन भर्रे यांचा जागीच मृत्यू झाला. दोन जण गंभीररीत्या जखमी असून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर कारमधील चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य राबवले. पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *