कुणबी समाज म्हणतोय, ‘आता आश्वासन नको, ठोस निर्णय हवा’
✳ स्वतंत्र महामंडळ व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे ✳ ओबीसी जातनिहाय जनगणनेची मागणी
दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- कुणबी समाज म्हणतोय, ‘आता आश्वासन नको, ठोस निर्णय हवा’ या भूमिकेतून कुणबी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी चार प्रमुख मागण्या शासनापुढे मांडण्यात आल्या आहेत. स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जयंती-पुण्यतिथीचा अधिकृत कार्यक्रमांत समावेश आणि ओबीसी जातनिहाय जनगणना या मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले.
स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा कुणबी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, शेतकरी, युवक, महिला आणि उद्योजकांना आर्थिक प्रगतीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या महामंडळाला संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे नाव देऊन त्यामार्फत स्वयंरोजगार, उद्योग-व्यवसाय, कौशल्य विकास आणि आर्थिक सहाय्याच्या योजना राबवाव्यात.
ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना निवासाच्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे कुणबी समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात आवश्यकतानुसार मुला-मुलींची स्वतंत्र शासकीय वसतिगृहे सुरू करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळू शकेल, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
संत तुकाराम महाराजांचा कार्याचा गौरव करा संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून समता, मानवता आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला. त्यांच्या कार्याचा आणि विचारचा गौरव करण्यासाठी त्यांच्या जयंती व पुण्यतिथीचा शासनाच्या अधिकृत कार्यक्रमांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून अधिकृत व वस्तुनिष्ठ आकडेवारी उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या आकडेवारीच्या आधारे समाजाची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती समजून घेऊन विविध घटकांच्या गरजांनुसार कल्याणकारी योजनांचे नियोजन करता येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना डॉ. आशिष माटे, राधेश्याम गाडवे, मोरेश्वर सावेर्, ईश्वर माटे, लोकेश सावेर्, शोभाराम तिजारे, पुरुषोत्तम शेंडे, हरिदास मते, हंसराज आगारे, शुभम सिंगनजुडे, शुभम धुमनखेडे, विजेन्द्र झंजाडे, शंकर मोहर्ते, अमित मारवाडे, अनिल सेलोकर, अतुल आस्वले, डॉ. शरद गोमासे, हेमंत लोंदसे, अशोक बोंद्रे, मधुकर बुरडे, मयूर तिजारे, रमेश हारगुडे, भैय्या फाळे, दुर्जन डेंगे, अनिल बांडेबुचे, राजू माटे, राजेश चामट आदी बहुसंख्या कुणबी समाज बांधव उपस्थित होते.








