ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी
ट्रॅक्टर चालका विरुद्ध गुन्हा दाखल
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पोलीस स्टेशन सिहोरा अंतर्गत असलेल्या परसवाडा (सि.) नाल्यासमोरील सिमेंट रस्त्याच्या वळणावर भरधाव ट्रॅक्टरने मोपेडला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर १६ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी, २७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास घडला. तणासाने भरलेल्या ट्रॉलिसह येणाऱ्या निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरने मोपेडला धडक दिल्यानंतर दोन्ही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तारा कपूरचंद सातके यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिहोरा पोलिसांनी अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तारा कपूरचंद सातके (४५, रा. रेंगेपार) आणि सुमीत राजेश गुमा (वय १६) हे एमएच ३५ डीडी १९६९ क्रमांकाच्या मोपेडने सिलेगाव येथून परसवाडा गावाकडे जात होते. दरम्यान, परसवाडा नाल्यासमोर समोरून सिलेगावच्या दिशेने येणाऱ्या निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीमध्ये तणास भरलेली होती. ट्रॅक्टर चालकाने भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. धडकेनंतर मोपेडवरील तारा सातके आणि सुमीत गुमा हे दोन्ही गंभीर जखमी झाले. अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली. जखमींना तडीने सिहोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तारा सातके यांचा वैद्यकीय अहवालानुसार मृत्यू झाला. या घटेमुळे रेंगेपार (पांजरा) परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुसरीकडे, १६ वर्षीय सुमीत गुमा हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघात प्रकरणी सिहोरा पोलीस ठाण्यात अपघात क्रमांक ३८१/२०२६ अन्वे भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १२५ (ब), १०६ (१), तसेच मोटर वाहन कायद्यातील कलम १३४(अ), १३४ (ब) आणि १८४ अन्वे अज्ञात निळ्या रंगाच्या ट्रॅक्टर चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास थानेदार विजय कसोधन यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक हरिदास सुरपाम करीत आहेत. अपघातानंतर घटनास्थलनावरील परिस्थिती आणि उपलब्ध माहितीच्या आधारे ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असले तरीट्रॅक्टर व ट्रॅक्टर मालकाचा शोध घेण्याची मागणी होत आहे








