पालोरा परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

  • वीज पडून गोरा ठार, घर कोसळले

  • धान पिकाचे मोठे नुकसान

  • दै. लोकजन वृत्तसेवा

    करडी/पालोरा :- आज दुपारी १ वाजταςच्या सुमारास पालोरा परिसरात अचानक वातावरण बदल होऊन वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाने हजेरी लावली. जवळपास एक तास सुरू असलेल्या या तुफान पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.

    दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि विजांच्या गर्जनेमुळे नागरिकांना घराबाहेर निघणे देखील कठीण झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरात ठिकठिकाणी मोठी नासाडी झाली आहे.

    या वादळी पावासात सर्वात मोठी दुर्घटना मौजा खडकी येथे घडली. येथील शेतकरी जसवंत श्रीपत ठवकर यांचा ५ वर्षाचा गोरा घरासमोरील अंगणात असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बांधलेला होता. त्याच झाडावर वीज पडल्याने विजेच्या जोरदार धक्क्याने जागीच गोरा ठार झाला. या घटनेमुळे शेतकरी ठवकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

    या वादळी पावसाचा फटका बसल्याने दयाराम बाना हलमारे यांचे घर पडले असून कोणतीही जिवितहानी झालेली नाही परंतु काही साहित्य मातीच्या ढिगाऱ्यात दबले गेले.

    कान्हळगाव येथील शेतकरी पंढरी नंदू शेंडे यांच्या शेतातील सोलर प्लेट जवळ वीज पडल्याने सोलर प्लेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून टूटफूट झाली आहे.

    खडकी येथे गोरा ठार झाल्याची आणि पालोरा येथे घर पडल्याची माहिती मिळताच पालोरा येथील तलाठी प्रिया ठवकर, कोतवाल बादल तिरपुडे आणि मुलचंद उरकुडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मौकात पंचनामा केला आहे.

    या संपूर्ण नुकसानीचा महसूल विभाग आणि कृषी विभागाने तात्काळ पंचनामा करून बाधित शेतकऱ्यांना आणि घर पडलेल्या दयाराम हलमारे यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी सरपंच अश्विन बागडे, जसवंत ठवकर, नरेश ठवकर, दयाराम हलमारे आणि परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

    महामार्गावर झाड कोसळले

    दरम्यान, केसलवाडा ते साकोली या मुख्य मार्गावरील पालोरा रस्त्यावर वादळी वाऱ्यामुळे एक मोठे झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे बंद झाली होती. ग्रामस्थांनी झाड हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

    फुलोऱ्यावरील धान झडले

    पालोरा परिसरात यावर्षी हलक्या वाणाच्या धानाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. सध्या धान पीक फुलोऱ्यावर आले असताना झालेल्या या मुसळधार पावसामुळे ধानाचा फुलोरा गळून पडला आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *