नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांचा सलग दुसऱ्यांदा विजय दुसऱ्या पसंतीच्या मतांनी विजयाची मोहर

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत भाजपला धक्का दिला, तब्बल ५८ वर्षे भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघावर पुन्हा वर्चस्व मिळवण्याचे भाजपाचे स्वप्न धुळीस मिळाले. या निकालानंतर वंजारी यांनी भाजपच्या निवडणूक रणनीतीवर टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानांनाही प्रत्युत्तर दिले.

‘काँग्रेस लोकांच्या मनात!’ गुरुवारी मानकापूर क्रीडा संकुलात विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर वंजारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आपने निवडणुकीला इव्हेंटचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, मतदार नोंदणीबाबत मोठे आकडे सांगण्यात आले; मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत आम्ही आमच्या रणनीतीवर लक्ष केंद्रित केले. संघटना आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणून ताकदीने लढा दिला, असे त्यांनी सांगितले.

मतपत्रिके द्वारे झालेल्या निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीवरून पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेलाही वंजारी यांनी उत्तर दिले. ‘काँग्रेस कुठे आहे?’ असा प्रश्न उपस्थित केला जात असला, तरी काँग्रेस लोकांच्या मनात आहे, हे या निकालाने दाखवून दिले आहे, असा टोला त्यांनी लगावला. २०२१ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जिंकण्याच्या विश्वासाही त्यांनी व्यक्त केला.

निर्णायक कौल या निवडणुकीत अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांना मिळालेल्या मतांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांचा वंजारी यांना फायदा झाला, एकूण ६७,२३१ मते मिळवत त्यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा ३,२७१ मतांनी पराभव केला. आपने केंद्रीय नेतृत्वापासून स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत मोठी यंत्रणा सक्रिय केली होती. तरीही विजय मिळवण्यात अपयश आल्याने पक्षाच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

काँग्रेसची पकड कायम? २०२० च्या निवडणुकीत वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा १८,१९० मतांनी पराभव केला होता. त्या तुलनेत यंदाची लढत अधिक चुरशीची ठरली. विजयाचे अंतर कमी झाले असले, तरी सलग दुसऱ्या विजयामुळे काँग्रेसने पदवीधर मतदारसंघातील आपली उपस्थिती कायम राखली आहे.

भाजपासाठी हा निकाल केवळ एका जागेवरील पराभव नसून, पारंपरिक बालेकिल्ला पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नांना बसलेला धक्का मानला जात आहे. दुसरीकडे, काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांच्या चर्चेदरम्यानच वंजारी यांनी विजय मिळवल्याने त्यांच्या वैयक्तिक राजकीय प्रभावाचीही चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *