गणेश विसर्जन मिरवणुकीत अनधिकृतऱ्या डी. जे. वाजविणाऱ्या इसमाविरुद्ध साकोली पोलिसांची कारवाई
दै. लोकजन वृत्तसेवा
साकोली :- गणेश विसर्जन मिरवणुकीत अनधिकृतऱ्या डी.जे. वाजविणाऱ्या इसमाविरुद्ध साकोली पोलिसांनी कारवाई केली.
दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी साकोली शहरातील करंजेकर कॉलेज, जमनापूर रोड, साकोली परिसरात गणेश विसर्जनाचा कार्यक्रम सुरू असताना, टाटा ४०७ मालवाहू वाहन क्र. एम. एच. २९ टी. ४२६२ वर डी. जे. लावून मोठ्या व कर्कश आवाजात ध्वनीक्षेपण करण्यात येत असल्याचे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आले. सदर डी. जे. चा आवाज कमी करून नियमांचे पालन करण्याबाबत संबंधितांना पोलिसांकडून स्पष्ट सूचना देण्यात आली. मात्र, त्यानंतरही डी. जे. मोठ्या आवाजात सुरू ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच, सदर डी. जे. वाजविण्यासाठी आवश्यक परवानगीबाबत विचारणा केली असता संबंधिताकडे आवश्यक परवानगी नसल्याचे समोर आले.
या प्रकरणामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होऊन सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने, डी. जे. मालक १) सुनील गोपाल भुरे वय ३५ वर्ष रा. लाखनी ऑपरेटर – २) प्रतिक मिलींद कांबळे वय ३१ वर्ष, रा. केसलवाडा / वाघ ३) वाहन चालक नामे – आशिष संजय पंधरे वय ३२ वर्ष, रा. लाखनी यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन साकोली येथे कलम २२३ भारतीय न्याय संहिता, कलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच लागू असलेल्या मोटर वाहन कायद्याच्या तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
‘गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी ध्वनिप्रदूषण संदर्भातील शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करावे, तसेच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस स्टेशन साकोली यांच्याकडून करण्यात येत आहे.’








