शहरातील खड्डे आणि धुळीविरोधात शिवसेना (उ. बा. ठा) चे निदर्शने आणि रास्ता रोको आंदोलन
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा। शहरातील अंतर्गत रस्ते ही शहरवासीयांसाठी मागील अनेक वर्षापासून डोकेदुखी ठरली आहे. विकासाच्या नावावर रस्ते खोदले खरे, परंतु आजतागायत खोदलेले रस्ते हे पक्क्या स्वरूपात न बुजल्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास होत असल्यामुळे शिवसेना (उ.बा.ठा) तर्फे आज भंडारा शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात नगरपरिषद प्रशासना विरोधात निदर्शने करून धुळीपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी मास्क वाटप करून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शहरातील खड्डे आणि त्यातून उड़णाऱ्या धुळीमुळे वाहनधारकांना, सायकलस्वारांना, पादचाऱ्यांनाहोणारा प्रचंड त्रास लक्षात घेता शिवसेना तर्फे न. प. प्रशासनास, जिल्हा प्रशासनास अनेकदा तक्रारी केल्यात, परंतु त्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नव्हती. मागील न. प. निवडणुकी दरम्यान सत्ताधारी पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांनी प्रचारादरम्यान शहरवासीयांना मोठमोठे आश्वासने दिली. आता सत्ताधारी पक्षांचीच न. प. मध्ये सत्ता स्थापन होऊन जवळपास वर्ष होत असताना रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असताना सत्ताधाऱ्यांना हे दिसू नये हे भंडारा शहरवासीयांच्या दृष्टीने दुर्भाग्याची बाब आहे.
भंडारा शहरातील मिसकीन टॅंक ते पांडे महल, अण्णाभाऊ साठे चौक ते संताजी मंगल कार्यालय, राजीव गांधी चौक ते खात रोड दरम्यान ट्यूशन गल्ली, चांदनी चौक ते संताजी वार्ड, मिसकीन टॅंक ते पोस्ट ऑफिस चौक असे अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असताना ती पक्क्या स्वरूपात न बुजविता थातुरमातुर गिट्टी चुरी टाकून बुजविण्यात आल्यामुळे काही दिवसानंतर गिट्टी खड्या बाहेर निघाल्यामुळे खड्डे जैसे थे च च्या स्वरूपात येऊन या रस्त्यावरून एखादे जड वाहन गेल्यावर धुळीच्या लोट तयार होऊन त्याचा त्रास मागून येणाऱ्या दुचाकी स्वारांना, पादचाऱ्यांना प्रचंड होतो. खड्ड्यांमुळे अपघातांची श्रृंखला थांबायला तयार नाही. अनेकांना त्यातून कायमचे अपंगत्व सुद्धा आलेले आहे.
न. प. प्रशासनाने शहरवासीयांसाठी वाढवून ठेवलेल्या या खड्ड्यामुळे आणि धुळीमुळे नागरिकांमध्ये मणक्याचे तसेच श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन शिवसेना उबाठा शहर पदाधिकाऱ्यांमार्फत जिल्हाप्रमुख संजय रेपळे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. यादरम्यान मुर्दाबाद मुर्दाबाद, नगरपरिषद मुर्दाबाद.. रस्त्यावर खड्डे पुसून ठेवणाऱ्या नगरपरिषदेचा, निषेध असो, निषेध असो.., शहरवासीयों के हित मे शिवसेना मैदान मे, अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. बासोबत चौकातून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना शिवसेना तर्फे मास्क वाटप करण्यात आले. तदनंतर आंदोलन दरम्यान उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांनी चौकात ठाण मांडून रास्ता रोको आंदोलन सुद्धा केला. उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशन भंडारा कडे रवाणगी केली.
या आंदोलनात शिवसेना (उ.बा.ठा) जिल्हाप्रमुख संजय रेपहाडे, शहर प्रमुख राकेश आषडे, शहर संघटक प्रशांत देशमुख, मयूर जोशी, शहर समन्वयक़ ईश्वार टाले, उपशहर प्रमुख प्रकाश गभणे, विभाग प्रमुख अनिरुद्ध गाढवे, नितेश गभणे, यश पारधी, चित्रागंध सेलोकर, सोमेश्वर सेलोकर, हर्पल ढेमपूरकर, संतोष चांदीवार, योगेश पवनकर, राज वंधवाणी, विश्वजीत पंडा, निलेश धामट, हिमांशू भाजीपाले, शामराव मालखंडाले, मोनू हेडाऊ, अमित हटवार, नदीम शेख, जितेन्द्र बोरकर वेदांत गिरेपुंजे, प्रकाश निनावे, रोशन मेश्राम, मृणाल शामकुवर, वैभव मेश्राम, निशांत बाकोडे, नाना मते, सतीश धुर्वे, रामु लांजेवार, मीताराम जीभकाटे, प्रणय हरकंडे, धर्मेन्द्र डोमणे इत्यादी अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.








