सुनील मेंढेंच्या पराभवास पालकमंत्र्यांची निष्क्रियताही कारणीभूत

दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा गोंदिया मतदार संघात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना विजयी करणे हे आमचे सामूहिक कर्तव्य होते त्यामुळे या पराभवाची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. असमन्वय, अतिआत्मविश्वास आणि नकारात्मकता या गोष्टी अपयशासाठी जेवढ्या कारणीभूत आहेत तेवढीच. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची निष्क्रियताही कारणीभूत ठरली आहे, असा घणाघाती प्रहार महायुतीचे घटक असलेले अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकार परिषदेतून केला. आज भंडारा येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भंडारा गोंदिया मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांचा जवळपास ३५ हजार मतांनी पराभव केला. मात्र हा पराभवएकट्या भाजपचा नसून तो महायुतीचा अर्थात सर्व मित्रपक्षांचा आहे, असे भोंडेकर म्हणाले. महत्वाचे म्हणजे पालकमंत्री जिल्ह्याबाहेरचे असले तर असे घडणारच. आजही संजय गांधी निराधार योजनेची समिती गठित झालेली नाही, पालकमंत्र्यांंचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच निवडणूक काळात पालकमंत्री सक्रिय नसल्याने पराभवाची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळेच पालकमंत्री जिल्ह्यातील हवा, हा आमचा आग्रह होता. भंडारा पवनी विधान सभा क्षेत्रात सुनील मेंढे मोठ्या फरकाने मागे राहिले, ही आमच्यासाठी चिंतनाची बाब आहे. महायुतीचा घटक म्हणून आम्ही या क्षेत्रात सक्रिय प्रचार केला, सभेत गेलो मात्र नियोजनाचा अभाव आणि मेंढेंवर स्थानिकांचा रोष या गोष्टीही तेवढ्याच कारणीभूत ठरल्याचे भोंडेकर म्हणाले.

भोंडेकर यांनी नानांवरही निशाणा साधला. ते म्हणालेकी, नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असले तरी त्यांच्यामुळेच काँग्रेसने विजयी घोडदौड केली यात तथ्य नाही. म्हणजे रामटेक आणि चंद्रपूर लोकसभेत काँग्रेसचा विजय झाला तो फक्त नानांमुळे असेल तर तेथील स्थानिक नेत्यांचे कर्तृत्व नाही का, असा प्रश्न भोंडेकर यांनी यावेळी उपस्थित केला. जिल्ह्याचा विचार केल्यास नाना पटोले चार वेळा साकोलीचे आमदार होते, एकदा या मतदार संघाचे खासदार होते, असे असताना त्यांनी आजवर या मतदार संघासाठी किती निधी आणला, किती विकासाची कामे केलीत. यांचाही विचार व्हायला हवा. त्यामुळे कोणी कितीही गवगवा केला तरी भंडारा गोंदिया मतदार संघात डॉ. प्रशांत पडोळे यांच्या विजयामागे नानांचा फारसा वाटा नसून डॉ. पडोळे यांचे वडील दिवंगत यादोराव पडोळे यांची पुण्याईच त्यांच्या यशाचे गमक असल्याचे स्पष्ट मत भोंडेकर यांनी यावेळी व्यक्त केले. लोकसभेत पराभव पत्करावा लागला तरी पराभवास कारणीभूत ठरलेल्या कारणांची मीमांसा करून येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही जोमाने कामाला लागू. मात्र जर कार्यकर्त्यांची इच्छा नसेल तर मी निवडणुकीस उभा राहणार नाही, असेही भोंडेकर यांनी स्पष्ट केले.