शेतकऱ्यांचे पांदन रस्ते एका महिन्यात पूर्ण करा
*अतिक्रमण धारकांचे पट्टे वितरण तात्काळ करा
*आढावा बैठकीत आम. नरेंद्र भोंडेकर यांचे निर्देश
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- भंडारा विधानसभा क्षेत्र अंतर्गत दोन्ही तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागांच्या शेतकऱ्यांना सुविधा व्हावी याकरिता मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते योजना राबवून येत्या एका महिन्याच्या आत हे पांदन रस्ते पूर्ण करण्याचे निर्देश आम. नरेंद्र भोंडेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आज तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस ते समिती चे अध्यक्ष म्हणून संबोधित करीत होते. याच प्रमाणे दोन्ही तालुक्यातील अतिक्रमण धारकांना एका महिन्याच्या आत पट्टे आणि प्रॉपर्टी कार्ड देण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी दिले. स्थानिक तहसील कार्यालयात आज मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते योजना आणि अतिक्रमण नियमाुकुल समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. आम. नरेंद्र भोंडेकर हे या दोन्ही समितीच्या अध्यक्ष पदावर असल्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.
या बैठकीत संबंधित रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती, प्रगती तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पांदन रस्ते संदर्भात उपस्थित संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी आता पर्यंत तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचा आढावा दिला व पुढील नियोजनाची माहिती सादर केली. या वेळी आम. भोंडेकर यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, भंडारा पवनी या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना पांदन रस्त्या संदर्भात ज्या अडचणी आहेत त्या येत्या एका महिन्याच्या आत दूर झाल्या पाहिजे. शेतकऱ्यांना शेतापर्यंत सुलभ व बारमाही दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही कामे गुणवत्तापूर्ण व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना आम. भोंडेकर यांनी दिल्या. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक सुलभ होऊन त्यांच्या वेळेची, श्रमाची व खर्चाची बचत व्हावी आणि शेतीच्या विकासाला अधिक बळ मिळावे, या करिता मागेल त्याला पांदन रस्ते देवून शेत पाांद रस्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश ही दिले.
सोबतच काही पांदन रस्ते हे अस्तित्वात आहेत परंतु नकाशात ते रस्ते दिसून येत नाहीत, अश्या रस्त्यांचे सर्वे करून त्यांचा आराखडा तयार करा आणि यांना लवकरात लवकर नकाशा्यात सामील करण्याचे निर्देश या वेळी आमदार भोंडेकर यांनी दिले. अतिक्रमण धारकांना तात्काळ पट्टे व प्रॉपर्टी कार्ड देणे
अतिक्रमण धारकांना त्यांची हक्काची जागा मिळावी या करीता आम. नरेंद्र भोंडेकर यांनी शासन दरबारी तgada लावला होता. ज्याचे फलश्रुति ही झाली की भंडारा व पवनी तालुक्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील अतिक्रमण धारकांचे सर्वे करण्यात आले. या संदर्भात आता पर्यंत भंडारा येथे शहरी भागातील ११०० तर पवनी शहरी भागातील ३५० अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच भंडारा इथून पुन्हा ६ हजार आणि पवनी येथील जवळपास ५०० अर्ज येण्याची अपेक्षा आहे. आज या संदर्भात आयोजित बैठकीत आम. भोंडेकर यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले, की दोन्ही तालुक्यात शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील अतिक्रमण धारकांचे आलेले अर्ज येत्या एका महिन्याच्या आत मार्गी लावून नवीन अर्ज कसे येतील याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. इतकेच नाही तर मागेल त्याला पट्टे आणि प्रॉपर्टी कार्ड देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश सुद्धा आम. भोंडेकर यांनी दिले.
शहरी सोबतच दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागात ग्राम पंचायत स्तरावर सुद्धा मागेल त्याला पट्टे देण्याची व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश त्यांनी या वेळी दिले. याच प्रमाणे वन विभाग अंतर्गत झुडपी जंगल च्या ठिकाणी करण्यात आलेले अतिक्रमण धारकांचे पट्टे कसे देता येईल हा प्रश्न सुद्धा मार्गी लावण्याचे निर्देश आम. भोंडेकर यांनी या वेळी दिले. या बैठकीत उप विभागीय अधिकारी सह दोन्ही तालुक्यातील तहसीलदार, गट विकास अधिकारी, उप विभागीय अभियंता, वन विभागचे अधिकारी, भूमी अभिलेख अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व समिती चे अन्य सदस्य उपस्थित होते.








