गोंडसावरी येथे ग्रामसभेत अवैध दारू विक्री बंदचा ठराव
दै. लोकजन वृत्तसेवा
लाखनी:- तालुक्यातील गोंडसावरी येथे अवैध दारू विक्रेत्यांनी ग्रामसभेमध्ये जाहीर कबुली दिली असून, गावात १३ सप्टेंबरपासून ‘पूर्ण दारूबंदी’ लागू करण्याचा ठराव एकमनाने मंजूर करण्यात आला आहे. गोंडसावरी गावात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्रीला कायमचा लगाम घालण्यासाठी ग्रामस्थांनी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. १३ सप्टेंबर २०२६ रोजी संपूर्ण गावातील नागरिकांची एक विशेष आमसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत गावातील सर्व अवैध दारू विक्रेत्यांना प्रत्यक्ष बोलावून, त्यांच्याकडून ‘यापुढे गावात दारूविक्री करणार नाही’ अशी जाहीर कबुली लिहून घेण्यात आली. या धाडसी आणि एकजुटीच्या निर्णयामुळे गोंडसावरी गाव आता ‘पूर्ण दारूमुक्त गाव’ म्हणून मार्गक्रमण करत आहे. गेल्या काही काळापासून गावात वाढलेल्या अवैध दारूविक्रीमुळे शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली होती. तसेच तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत असल्याने महिलांमध्ये तीव्र असंतोष होता.
यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गावाने एकजूट दाखवली. आयोजित सभेत सरपंच सुभाष राऊत, उपसरपंच योगीराज फंदे, पोलीस पाटील राजीव तुमसरे आणि तंटामुक्त अध्यक्ष महेश तुमसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दारूविक्रेत्यांची कसून चौकशी करण्यात आली. या मोहिमेला गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहकार्य केले. महिलांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि ग्रामसमितीच्या कडक भूमिकेमुळे अखेर सर्व अवैध दारूविक्रेत्यांनी सभेमध्ये स्वतःहून शरणागती पत्करली. ‘आजच्या नंतर गावात कोणत्याही प्रकारची दारूविक्री किंवा वाहतूक करणार नाही’, अशी स्पष्ट कबुली त्यांनी सर्व गावकर्यांसमोर दिली. ग्रामपंचायतीने आणि तंटामुक्त समितीने इशारा दिला आहे की, या जाहीर कबुली नंतरही जर गावात कोणी गुपचूप दारूविक्री करताना आढळल्यास, त्याच्यावर पोलीस पाटील आणि स्थानिक प्रशासनामार्फत थेट कडक कायदेशीर व फौजदारी कारवाई केली जाईल. गावकर्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन घेतलेल्या या निर्णयाचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे.








