बोगस डॉक्टर आढळल्यास तत्काल गुन्हा दाखल कराजिल्हाधिकारी सावन कुमार यांचे निर्देश
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा:- जिल्ह्यातील बोगस वैद्यकीय व्यवसायाला आळा घालण्यासाठी बोगस वैद्यकीय व्यवसायिकांविरुद्ध तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिले. जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय पुनर्वलोकन समितीची बैठक झाली. बैठकीला बैठकीस उपजिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पवार, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुजाता दुधगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीप गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त शहनाज ताजी, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिषा साकोडे आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन चव्हाण उपस्थित होते. या वेळी बोगस वैद्यकीय व्यवसायासंदर्भातील यापूर्वीच्या कारवाया, प्राप्त तक्रारी आणि प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.
नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या अनधिकृत उपचारांना आळा घालण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून माहिती संकलित केली जाणार आहे. पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी प्रत्येक ग्रामपंचायतीला भेट देऊन सरपंचांकडून बोगस डॉक्टरांची माहिती घेतील. ही माहिती तालुका समितीमार्फत जिल्हास्तरीय पुनर्वलोकन समितीकडे पाठविण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान बोगस वैद्यकीय व्यवसायिक आढळ्यास कोणतीही दिर्घाई न करता गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच उपचार घेण्यापूर्वी संबंधित व्यक्ती पात्र व नोंदणीकृत डॉक्टर आहे की नाही, याची खात्री नागरіकांनी करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.








