करडीत २५ गावच्या गणेश मंडळांचा ऐतिहासिक निर्णय : विसर्जन मिरवणूक राहणार डीजे मुक्त

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. तेजस सारडा यांच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
थारणेदार नागलोट यांचेही शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन

दै. लोकजन वृत्तसेवा
करडी/पालोरा:- मोहाडी तालुक्यातील करडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या २५ गावांतील सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूक डीजे मुक्त साजरी करण्याचा एकमुखी संकल्प केला आहे. करडी पोलिस स्टेशन येथे आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. तेजस सारडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेली या बैठकीला २५ गावांतील गणेश मंडळांचे अध्यक्ष, सचिव, सदस्य, पोलीस पाटील तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. तेजस सारडा म्हणाले, ‘गणेशोत्सव हा आनंदाचा आणि भक्तीचा सण आहे. या उत्सवदरम्याने सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणबाबत घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. डीजे च्या कर्कश आवाजामुळे लहान मुले, वृद्ध, रुग्ण आणि विद्यार्थीना मोठा त्रास होतो. त्यामुळे कोणतीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व मंडळांनी आपली विसर्जन मिरवणूक डीजे मुक्त ठेवादी. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात उत्सव साजरा करावा. कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.’

करडी पोलीस स्टेशनचे थानेदार गौरनाथ नागलोट यांनीही यावेळी मंडळांना आवाहन केले. ते म्हणाले, ‘प्रत्येक मंडळाने आपल्या मंडपात सीसीटीव्ही बसवावेत, स्वयंसेवकांची नियुक्ती करावी, विसर्जनाचा मार्ग आणि वेळेचे नियोजन पोलिसांना आधी कळवावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि काही अनुचित प्रकार दिल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. पोलीस प्रशासन आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे. शांततेत उत्सव पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.’

पोलिस प्रशासनाच्या या आव्हानाला प्रतिसाद देत उपस्थित सर्व २५ गणेश मंडळांच्या अध्यक्ष आणि सचिवांनी विसर्जन मिरवणूक डीजे मुक्त काढण्याचे लेखी हमीपत्र देऊन आश्वासन दिले आहे.

करडी पोलिसांच्या या पुढाकाराचे आणि मंडळांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून यामुळे परिसरात आदर्श उत्सवाचा पायंडा पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *