‘पविंत्र’ भरतीत हिंदी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय? पसंतीक्रम उपलब्ध नसताना ‘लॉक’ केल्याचा दावा
नियुक्त्या स्थगित करून फेरचौकशीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा
दै. लोकजन वृत्तसेवा
गोंदिया :- पवित्र पोर्टल २०२५च्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत हिंदी माध्यमाच्या पात्र उमेदवारांना अपेक्षित संधी मिळाली नसल्याचा आरोप करीत उमेदवारांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे. हिंदी माध्यमाच्या रिक्त जागांवर मराठी माध्यमातून उमेदवारांची निवड झाल्याने पात्र हिंदी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय झाल्याचा दावा करीत या प्रक्रियेची फेरतपासणी करून न्याय देण्याची मागणी बुधवारी १६ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, पवित्र पोर्टलच्या टप्पा-१ मध्ये हिंदी माध्यमासाठी असलेल्या काही जागांवर अशा उमेदवारांची निवड झाली आहे, ज्यांनी डी.एड. हिंदी माध्यमातून पूर्ण केले आहे. मात्र, संबंधित जाहिरातीमध्ये माध्यमनिहाय पात्रता, विषय आणि पसंतीक्रम याबाबत विसंगती राहिल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे शुद्ध हिंदी माध्यमाच्या पात्र उमेदवारांना त्यांच्या माध्यमातील पदांसाठी समान संधी मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भत शिक्षणाधिकारी, शिक्षण आयुक्त तसेच शालेय शिक्षण विभागाच्या मंत्र्याकडे निवेदने देऊनही ठोस तोडगा निघालेला नसल्याची भूमिका उमेदवारांनी मांडली. ९ सप्टेंबर रोजी गोंदिया येथील शिक्षणाधिकाऱ्यांसमोर समस्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी इयत्ता सहावी ते आठवी तसेच नववी-दहावीच्या हिंदी व मराठी माध्यमातील जाहिरातीमधील तфаवत, हिंदी विषयाचा पसंतीक्रम आणि माध्यमनिहाय जागांच्या उपलब्धतेतील विसंगती निदर्शनास आणून देण्यात आल्याचे उमेदवारांनी सांगितले.
विशेष म्हणजे, काही उमेदवारांनी पसंतीक्रम लॉक केला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मात्र, ‘पवित्र’ पोर्टलवर पसंतीक्रम उपलब्ध झाला नसेल, तर तो लॉक कसा करायचा? असा सवाल उपस्थित करून या बाबतची वस्तुस्थिती लेखी स्वरूपात स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली. उमेदवारांनी हिंदी माध्यमातील भरतीसंदर्भातील नियुक्त्या चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थगित ठेवण्यात याव्यात, तसेच प्रक्रियेतील त्रुटींची चौकशी करून दोषींवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी केली. हिंदी माध्यमाच्या उर्वरित रिक्त जागांपैकी २० टक्के जागा राखीव ठेवून उर्वरित जागा टप्पा-२ मध्ये भरण्याची मागणीही करण्यात आली.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा तसेच उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा उमेदवारांनी दिला आहे. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेतील माध्यमनिहाय पात्रता आणि पसंतीक्रमाचा मुद्दा आता अधिक तीव्र होण्याची चिन्हें आहेत. पत्र परिषदेला राजेश्वरी बसেনা संजय सुलाखे, दिनेश तुरकर, गजेंद्र तुरकर, यानीश ठाकरे, वर्षा ठाकरे, शम्मी पुंडे, दीपक मच्छरिंके, गायत्री नागपुरे, ललित मच्छरिंके, ज्योती मच्छरिंके, प्रवीण सुलाखे आदी उपस्थित होते.








