जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी
-
१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान सेवा संकल्प अभियान
-
नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या सूचना
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजना व सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची सर्व विभागांनी समन्वयाने व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.
तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करून नागरिकांच्या प्रलंबित कामांचा निपटारा करावा तसेच जास्तीत जास्त नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिल्या.
जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, अपर पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक आयुक्त, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
अभियानाच्या कालावधीत सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. या शिबिरांमध्ये नागरिकांचे अर्ज स्वीकारणे, प्रलंबित कामांचा निपटारा करणे आणि विविध दाखले व शासकीय योजनांचे लाभ तात्काळ वितरीत करण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी यावेळी दिले.








