जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत रुग्णसेवेसाठी मोकळी करा

जीएमसीसाठी नवीन इमारत उभारावी, माजी आ. चरण वाघमारेंची मागणी

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीत जीएमसी स्थलांतरित झाल्यापासून रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. डॉक्टर वेळापत्रकानुसार उपलब्ध नसणे, आवश्यक वैद्यकीय सेवा प्रभावीपणे न मिळणे यामुळे सर्वसामान्य रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप माजी आमदार चरण सोविंदा वाघमारे यांनी केला आहे.

पूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून मिळणाऱ्या सेवेच्या तुलनेत सध्याच्या व्यवस्थेत अनेक अडचणी निर्माण झाल्याची भावना रुग्ण, त्यांचे नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक व्यक्त करत आहेत. दाखल झाल्यानंतरही वेळेवर उपचार न मिळणे, डॉक्टरांच्या उपलब्धतेबाबत प्रश्न आणि कथित अनियमितता यामुळे गरीब, गरजू व ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास येत आहे.

या परिस्थितीबाबत विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली असून जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रारी करण्यात आल्या आहेत. वृत्तपत्रांमधूनही याबाबत अनेकदा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ नाराजीपुरता नसून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी निगडित गंभीर सार्वजनिक प्रश्न बनला आहे, असे वाघमारे म्हणाले.

शासकीय वैद्यकीय महाविद्याचा उद्देश वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार आणि चांगल्या आरोग्यूसेवा देणे हा आहे. मात्र त्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत ताब्यात घेतल्याने रुग्णसेवेत अडचणी निर्माण होत असल्याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

जीएमसीसाठी स्वतंत्र नवीन इमारत तالدीने उभारावी किंवा पर्यायी इमारत उपलब्ध करून द्यावी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाची जुनी इमारत रुग्णसेवेसाठी मोकळी करावी, अशी ठाम मागणी वाघमारे यांनी केली आहे. जुनी इमारत पुन्हा उपलब्ध झाल्यास जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नियंत्रणाखाली पूर्वीप्रमाणे स्वतंत्र प्रशासकीय व वैद्यकीय व्यवस्था कार्यरत ठेवता येईल, त्यामुळे डॉक्टरांची उपलब्धता, उपचार आणि नियोजन अधिक प्रभावी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नागरिकांना केवळ वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव नको, तर वेळेवर उपचार, तज्ज्ञ डॉक्टर, तपासण्या, औषधे आणि सक्षम व्यवस्था हवी आहे. आरोग्यव्यवस्थेतील त्रुटीचा सर्वाधिक फटका गरीब व दुर्बल रुग्णांना बसतो, त्यामुळे याकडे जनतेच्या आरोग्याचा गंभीर विषय म्हणून पाहावे, असे ते म्हणाले.

यासाठी राज्य शासनाकडे त्यांनी सात मागण्या केल्या आहेत. यात जीएमसीसाठी नवीन इमारतीची प्रक्रिया तात्काळ सुरू करणे, तोपर्यंत पर्यायी इमारतीत स्थलांतर, जुनी इमारत जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नियंत्रणाखाली देणे, उपचारातील दिरंगाई व अनियमिततेची निष्पक्ष चौकशी, डॉक्टरांच्या उपस्थितीची नियमित तपासणी, तक्रार निवारण यंत्रणा आणि कालबद्ध कृती आराखडा जाहीर करणे यांचा समावेश आहे.

रुग्णालयाच्या इमारतीपेक्षा रुग्णांचे आरोग्य महत्त्वाचे असून शासनाने तात्काळ ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी आमदार चरण सोविंदा वाघमारे (तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्र, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्ष, भंडारा) यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *