शहरातील चार पदरी रस्त्यालगतचे नाली बांधकाम अत्यंत निकृष्ट, क्युरींगचा अभाव
शिवसेना (उबाठा) चे आरोप, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- भंडारा शहरातून जाणाऱ्या जुन्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. या कामांतर्गत नागपूर नाका ते जिल्हा परिषद चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नालीचे बांधकाम सुरू आहे. मात्र हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून त्यावर योग्य पद्धतीने क्युरींग केले जात नसल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाषाने केला आहे. यासंदर्भात पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
मुजरी ते कारधा या जुन्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कॉन्ट्रॅक्ट सिमा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळाले आहे. काँक्रिटचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर मजबूतीसाठी दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी मारून क्युरींग करणे बंधनकारक असते. क्युरींग शिवाय बांधकामाला मजबुती येत नाही. मात्र सिमा कंपनीच्या अभियंत्यांना या बाबीचा विसर पडल्याचे दिसते. तयार झालेली नाली दिवसा कोणत्याही वेळी पाहिली तरी ती पूर्णपणे कोरडी दिसते, त्यामुळे बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
क्युरींग अभावी हे बांधकाम भविष्यात कमकुवत होऊन पावसाळ्यात नाली फुटण्याची, रस्ता खचण्याची भीती आहे. याचा थेट भुर्दंड आसपासच्या वसाहतीतील नागरिकांना बसून असून शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा होईल, असे सेनेने म्हटले आहे. सिमा कंपनीने हे कॉन्ट्रॅक्ट खूप जास्त Below मध्ये घेतल्याने कंपनी दर्जाकडे दुर्लक्ष करून घाईघाईत काम गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचे चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. असे झाल्यास शासनाला चुना लावून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार ठरेल. या कामात गुणवत्ता राखावी आणि दररोज किमान दोन ते तीन वेळा क्युरींग करण्याचे बंधन घालावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी शहर प्रमुख राकेश आग्रे, शहर संघटक प्रशांत देशमुख, मयूर जोशी, प्रकाश गभणे, राजेश ठवकर, नितेश गभणे, हिमांशू भाजीपाले, शामराव मालखंडाळे, संतोष चांदीवार, अनिरुद्ध गाढवे, मोनू हेडाऊ, धर्मेद्र डोमणे आदी उपस्थित होते.








