‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियानांतर्गत जिल्हा काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न

वोट चोरीविरोधात जनजागृतीसाठी नुक्कड सभा

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियानाच्या अनुषंगाने भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी साखरेकर सभागृह, भंडारा येथे संघटनात्मक आढावा बैठक आयोजित करण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या केंद्रीय निरीक्षक तथा माजी खा. ॲड. अमी याज्ञिक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.

बैठकीमध्ये मतदारांच्या हक्कांचे संरक्षण, मतदार यादीतील कथित अनियमितता, वोट चोरीचा मुद्दा तसेच लोकशाही व्यवस्थेच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जनजागृती अभियानाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या केंद्रीय निरीक्षक माजी खासदार ॲड. अमी याज्ञिक यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियान अधिक व्यापक आणि प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश दिले. मतदारांचा मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा आत्मा असून, त्या अधिकाराचे संरक्षण करणे ही काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. मतदारांच्या हक्कांबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी केवळ पक्षीय बैठका पुरेशा नसून, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी थेट सामान्य नागरिकांमध्ये जाऊन संवाद साधण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, शहर, गाव आणि बूथ स्तरावर नुक्कड सभा, चौपाल, जनसंवाद कार्यक्रम तसेच प्रत्यक्ष जनसंपर्काच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले. मतदार यादीतील नोंदींची पडताळणी, मतदानाचा अधिकार, मतदारांच्या हक्कांचे संरक्षण आणि वोट चोरीच्या मुद्द्याबाबत सामान्य जनतेला माहिती देऊन लोकशाहीच्या रक्षणासाठी जनतेला जागरूक करण्याचे आवाहन करण्यात आले.

दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या मोर्चाच्या अनुषंगानेही बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून पक्षाची भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव जिया पटेल, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकुंद साखरेकर, माजी जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, मधुकर लिचडे, प्रमोद तितिरमारे, जयश्री बोरकर, स्वाती वाघाये, गणेश लिमजे यांच्यासह विविध सेल व फ्रंटल संघटनांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *