आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वात मोहाडी येथे धडक मोर्चा
दै. लोकजन वृत्तसेवा
मोहाडी :- शेतकरी, युवा, बेरोजगार, महिला आणि वृद्ध नागरिकांच्या अतिनिकडीच्या २५ प्रमुख मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने मोहाडी तहसील कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. पक्षाचे नेते आमदार रोहित पवार, सलील देशमुख यांच्या नेतृत्वात तसेच माजी आमदार व भंडारा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा पार पडला.
चंडेश्वरी मंदिर परिसरापासून ते तहसील कार्यालयादरम्यान हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्यात मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते. तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर मोहाडीच्या तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.
या निवेदनात शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांवर भर देण्यात आला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना ३,५०० रुपये हमीभाव द्यावा, सरकारने जाहीर केलेला बोनस तातडीने द्यावा, संपूर्ण कर्जमाफी करावी,नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान तातडीने द्यावे आणि उन्हाळी धान्याचे प्रलंबित पेमेंट त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यासोबतच वृद्धापकाळ पेन्शन दरमहा २ तारखेपर्यंत बँक खात्यात जमा करावी, बायोमेट्रिक त्रुटीमुळे बंद झालेले रेशन आणि पेन्शन तातडीने सुरू करावे, आणि ‘लाडकी बहीण’ योजनेचे बंद पडलेले लाभ पूर्ववत करावेत, अशी मागणीही निवेदनात आहे. एसटी बस प्रवासात महिलांना मिळणाऱ्या ५० टक्के सवलतीतील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, एमआरईजीएस मजुरीचे प्रलंबित हफ्ते तातडीने द्यावेत, नगरपंचायतीचा वाढीव कर पुनर्रचित करावा आणि स्पर्धा परीक्षांचे पेपर सातत्याने फुटत असल्याने परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्याव्यात, अशा एकूण २५ मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यादरम्यान या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) भंडारा जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष गोंदिया रविकांत बोपचे, जिल्हाध्यक्ष वर्धा अतुल वांदिले, हिरालाल नागपुरे, राणीताई ढेंगे, संदीप ताले, नितेश मारवाडे, हेमराज नागफासे, मेहताबसिंग ठाकूर, गौरव नवरखेले यांच्यासह मोहाडी व तुमसर तालुक्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








