आज ग्रामीण भागात झडत्यांनी गाजणार पोळ्याची संध्या
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा:- आज पोळा सण. ग्रामीण भागातील बळीराजा अंगावर फाटकी बनियन, पण उसने घेऊन आपल्या ‘सर्ज़ा-राजा’ चा साजश्रृंगार करण्यासाठी सज्जा झाला आहे.
शेतकऱ्यांचे वैभव असलेल्या बैलाचा दिवस म्हणजे पोळा होय. पोळ्यास बैलपोळा, असे देखील म्हणतात. पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात व शेतकऱ्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात पिक डौलात असतात. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूणच आनंदाचे वातावरण असते. मात्र दिवसेंदिवस होणाऱ्या नापीकीमुळे व खालावणाऱ्या आर्थिक परिस्थितीमुळे पोळ्याचा उत्साह कमी होत आहे.
पोळ्याच्या दिवशी ग्रामीण भागात झडत्यांना विशेष महत्व आहे. ढोल ताशाच्या गजरात शेतकऱ्यांनी जेथे पोळा भरतो तेथे बैल आणले की झडत्यांच्या सामन्याला सुरुवात होते. ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी म्हटलया जाणाऱ्या झडत्यातून सर्वसामान्य शेतकऱ्याची परिस्थिती विशद होते. एक दुसऱ्यावर मात करुन झडतीद्वारे आनंद घेतला जातो.
पोळ्याच्या आदल्या दिवशी वर्षभर राबणाऱ्या बैलांचे खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. वर्षभर राबणाऱ्या बैलांचे खांदे तेल आणि हळद लावून शेकले जातात. दरवर्षी वाढत जाणारी महागाई शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे आहे.
असंख्य झडतीनंतर एक रांगेत उभे असलेल्या बैलांच्या जोडीची पूजा केली जाते. त्या नंतर तोरण तोडल्या जाते आणि पोळा फुटतो, शांत संयमी परंपरागत पद्धतीने साजरा होणारा पोळा शहरी भागातील नागरिकासाठी काहीसा निरस ठरणारा असला तरी ग्रामीण भागात मात्र पोळ्याचा उत्साह आजही कायम आहे.
बैलांच्या जोड्या त्यानंतर सुसाट वेगाने निघतात आणि आपल्या धन्याच्या घरी मानाची पूजा घेण्यासाठी पळतात.
पोळा पाहण्यासाठी आलेले नागरिकही बैलाची सजावट पाहून थक्क होतात आणि घरी गेल्यावर जोडीची पूजा करुन बैलजोडीला नैवैद्य दाखवितात.
उत्साhala उधान आलेल्या दिवशी शेतकरी पोळ्यात एकमेकांना अक्षदांचा टिका कपढाला लावून आर्जींग देऊन स्नेहभाव प्रकट करता.
पूर्वीच्या काळी पाटलाची बैलजोडी वाजत गाजत निघत असे मात्र आता पाटलांची जोळी गेली. पोळ्याच्या दुसऱ्या दिवसांपासून पूर्वीसारखे रहाटगाडे पुन्हा बैलाचे नसीबी येत असले तरी पोळ्याचा आनंद शेतकऱ्यासाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणांचे स्वरूपही बदलत असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही कायम आहे हे मात्र खरे.
काही ठिकाणी भरतो ट्रॅक्टरचा पोळा
यांत्रिक युगात बैलांची संख्या निम्मावर आली आहे तर ट्रॅक्टर दुप्पट झाले आहेत. यामुळे या बैल पोळ्यात पूर्वी सारखा उत्साह दिसून येत नाही. तरी ज्या शेतकऱ्यांनजवळ बैल आहेत, त्यांची पूजा करण्यासाठी सर्वच आतूर असतात. काही ठिकाणी ट्रॅक्टरचा पोळा भरत असतो. ट्रॅक्टर चालक व मालक ट्रॅक्टर सजवून पोळ्यात आणत असतात.








