मासे पकडताना पाय घसरला; ८ वर्षीय जयेशचा तलावात बुडून दुर्दैवी अंत
दै. लोकजन वृत्तसेवा
अर्जुनी-मोरगाव :- मासे पकडण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या अवघ्या आठ वर्षीय चिमुकल्याचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी ५ सप्टेंबर रोजी निलज येथे घडली. जयेश भुमेश्वर चौधरी असे मृत बालकाचे नाव आहे. तो तिसऱ्या वर्गात शिकत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, जयेश शनिवारी ५ सप्टेंबर रोजी मित्रांसोबत खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. खेळता-खेळता मुले घराशेजारील कान्हाबोळी तलावाजवळ पोहोचली. तलावाच्या काठावर मासे पकडत असताना जयेशचा अचानक पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला. पाण्याची अंदाज न आल्याने तो बुडाला.
मित्रांच्या आरडाओरडीनंतर ग्रामस्थांनी धाव घेत जयेशला पाण्यातून बाहेर काढले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच अर्जुनी-मोर पोलीस घटनास्थलॉी दाखल झाले. पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने चौधरी कुटुंबाियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून निलज गावावर शोककळा पसरली आहे.








