चंडीटोला-वऱ्हाडघाटात गाईची शिकार; वनविभागाच्या कॅमेऱ्यात पट्टेदार वाघ कैद!
परिसरात सतर्कतेचा इशारा; धान कापणीच्या हंगामात शेतकरी-पशुपालकांच्या चिंतांत भर
दै. लोकजन वृत्तसेवा
गोंदिया :- गोंदिया : देवरी तालुक्यातील चंडीटोला – वऱ्हाडघाट परिसर पट्टेदार वाघाचा वावर आढळून आल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वऱ्हाडघाट येथे वाघाने गाईची शिकार केल्यानंतर वनविभागाने घटनास्थळी कॅमेरे लावले. या कॅमेऱ्यांमध्ये पट्टेदार वाघाचे छायाचित्र कैद झाल्याने परिसरातील वन्यप्राण्यांच्या हालचालींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गाईची शिकार; वाघाच्या वावरणावर शिक्कामोर्तब
शिरपूर गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या वऱ्हाडघाट येथील रहिवासी राखडू कोराम यांच्या गाईची १६ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास वाघाने शिकार केली. यानंतर वनविकास महामंडळाच्या देवरी वनविभागाने घटनास्थळी कॅमेरे बसवून परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्यामध्ये पट्टेदार वाघाचे छायाचित्र दिसून आले. त्यामुळे चंडीटोला आणि वऱ्हाडघाट परिसरात नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
ऐन धान कापणीच्या हंगामात वाढली चिंता
सध्या परिसरात धान कापणीचा हंगाम सुरू असून शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालकांची शेतशिवारात मोठी वर्दळ असते. शेतातील कामे, जनावरांची देखभाल आणि शेतमालाची आवराआवर यांमुळे नागरिकांना घराबाहेर पडावे लागते. अशा परिस्थितीत वाघाचा वावर आढळल्याने मानवी सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा ठरला आहे. विशेषतः शेतात एकट्याने जाणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
वनविभागाचे सावधगिरीचे आवाहन
देवरी वनपरिक्षेत्र अधिकारी जे. एस. फाटकर यांनी चंडीटोला, वऱ्हाडघाट आणि परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जंगल परिसरात अनावश्यक जाणे टाळावे, शेतात जाताना शक्यतो समूहाने जावे, तसेच लहान मुले आणि पाळीव जनावरांची विशेष काळजी घ्यावी, असे त्यांनी सूचित केले आहे.
वाघ दिसल्यास त्याच्या जवळ जाणे, त्याला हुसकावून लावणे किंवा त्याचा पाठलाग करणे टाळावे. अशा वेळी तातडीने वनविभागाला माहिती द्यावी. धान कापणीचा हंगाम आणि वन्यजीवाचा वावर यांची सांगड घालताना नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. मानवी जीविताचे संरक्षण आणि वन्यजीवांचे सुरक्षित अस्तित्व या दोन्ही बाबी लक्षात घेऊन नागरिकांनी वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे.








