अखेर धान खरेदीला हिरवा कंदील

शेतकऱ्यांना दिलासा; साधारण धान्याला २,४४९ रुपये हमीभाव

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक बातमी आहे. खरीद पणन हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाने धान आणि भरडधान्य खरेदीसाठी महत्त्वाचा निर्णय घेत महत्त्वाच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखविला आहे.

शासनाच्या नव्या निर्णयानुसार साधारण दर्जाच्या धान्यासाठी प्रतिविंटल २,४४९ रुपये निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय खरेदीत निश्चित दराचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शासनाने यासोबतच इतर भरडधान्यांसाठीही आधारभूत दर जाहीर केले आहेत. यामध्ये ज्वारी (संकरित) ४,०१३ रुपये, ज्वारी (मालदांडी) ४,००३ रुपये, बाजरी २,१०० रुपये आणि मका २,४९० रुपये प्रति क्विंटल दर निश्चित करण्यात आला आहे. बाजरी, मका आणि रागी या भरडधान्यांचीही खरेदी करण्यात येणार असून, खरेदी केलेल्या धान्याची साठवणूक, भरडाई आणि त्यापासून तयार होणाऱ्या तांदळाची साठवणूक शासकीय गोदामात करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची तसेच संस्थांवर राहणार आहे. भरडधान्यांच्या गुणवत्तेबाबत तपासणी करूनच ती शासकीय गोदामात साठवण्यात येणार आहेत.

धान खरेदीत गुणवत्ता तपासणी बंधनकारक

पणन हंगाम २०२५-२६ मध्ये किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत धान व भरडधान्य खरेदी करताना केंद्र शासनाने विहित केलेल्या गुणवत्ता निकषांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. निर्धारित निकषानुसार तपासणी केल्यानंतरच धान व भरडधान्याची खरेदी करावी. तपासणीत नाकारलेल्या धान्याची माहिती दर १५ दिवसांनी जिल्हा पणन अधिकारी किंवा प्रादेशिक व्यवस्थाўकांनी शासनाला सादर करावी. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील गुणवत्ता नियंत्रणणारे प्रशिक्षित कर्मचारी धान्याची तपासणी करतील. कमी दर्जाचे धान खरेदी झाल्यास किंवा तपासणी व साठवणुकीदरम्यान त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकारी व संस्थेवर जबाबदारी राहील. दोषपूर्ण होणारे आर्थिक नुकसान त्यांच्यावर वसूल करण्यात येईल. गुणवत्तेचे निकष उल्लंघन करून खरेदी केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.

शेतकऱ्यांना आधारभूत किमतीचा लाभ मिळवून देण्यासाठी खरेदी प्रक्रिया विहित कालमर्यादित पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदी केंद्रांचे नियोजन, धान्याची गुणवत्ता तपासणी आणि साठवणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *