गोसेखुर्द १०० टक्के भरले; दुष्काळात ‘समाधाना’ची साठवण

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- राज्यावर अल-निनोचे सावट आणि अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळची चाहूल असताना पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्प निर्मितीच्या तब्बल ४० वर्षांनंतर तिसऱ्यांदा १०० टक्के पूर्ण क्षमतेने भरला आहे.

गोसेखुर्द धरणात २००९ पासून पाणी भरण्यास सुरुवात झाली. मात्र गेल्या १७ वर्षांत केवळ तीन वेळाच हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. जानेवारी २०२२ मध्ये पहिल्यांदा, फेब्रुवारी २०२५ मध्ये दुसऱ्यांदा आणि ऑक्टोबर २०२६ मध्ये तिसऱ्यांदा हे धरण १०० टक्के भरले आहे.

या धरणामुळे भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांतील तब्बल २ लाख ५९ हजार ५१२ हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे. भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी, लाखांदूर, लाखनी, नागपूर जिल्ह्यातील भिवापूर, कुही, उमरेड आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली या तालुक्यांना याचा थेट फायदा होणार आहे.

धरणाची वैशिष्ट्ये

धरणाची एकूण क्षमता ११४६ दशलक्ष घनमीटर असून जिवंत पाणीसाठा ७४० दशलक्ष घनमीटर आहे. धरणाची उंची २४५.५०० मीटर आहे. लाभक्षेत्र १ लाख १६ हजार ६०० हेक्टर असून सिंचन क्षमता २ लाख ५९ हजार ५१२ हेक्टर आहे. यामध्ये खरीप हंगामासोबत रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांचाही समावेश आहे.

कमी पाऊस होऊनही भंडारा जिल्हा प्रशासन आणि गोसेखुर्द प्रकल्प प्रशासनाच्या अचूक नियोजनमुळे शेड्युलनुसार १५ ऑक्टोबर रोजीच हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. देशभरात अनेक मोठे प्रकल्प कोरडे पडत असताना गोसेखुर्द प्रशासनाने दाखवलेली तत्परता आणि उत्कृष्ट व्यवस्थापन हे राज्यभरासाठी आदर्श मॉडेल ठरत आहे.

धरण पूर्ण भरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून रब्बी हंगामाच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *