भंडारा महिला जिल्हा रुग्णालयाच्या २८.५० कोटींच्या साहित्य खरेदीत घोटाळा
शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांचा गंभीर आरोप
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- भंडारा शहरातील स्वतंत्र महिला जिल्हा रुग्णालयासाठी करण्यात आलेल्या सुमारे २८ कोटी ५० लाख रुपयांच्या साहित्य खरेदीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या प्रकरणाची चौकशी रखडवली जात असून माहिती अधिकारातही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत रेहपाडे म्हणाले, मागील सुमारे २ ते २.५ वर्षांपासून भंडारा जिल्ह्यात स्वतंत्र महिला जिल्हा रुग्णालय सुरू होत आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक साहित्य खरेदीचे प्रकरण आम्ही मागील दीड वर्षापासून हाताळत आहोत. जवळपास साडे २८.५० कोटी रुपयांचे टेंडर या ठिकाणी काढण्यात आले.
या प्रकरणी मागील पावसाळी अधिवेशनात सेनेचे आम. अनिल परब यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी लावून प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आरोग्य विभागाने मुंबई येथील सहसंचालक तडस यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपवली. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तडस साहेब आपल्या टीमसह भंडारात येऊन चौकशी करून गेले. मात्र अद्याप चौकशी अहवाल शासनाकडे सादर झालेला नाही. मी माहिती अधिकारात चौकशी अहवाल मागितला असता, ‘अद्याप चौकशी पूर्ण व्हायची आहे आणि ही माहिती व्यापक जनहिताच्या दृष्टीने नसल्यामुळे देता येऊ शकत नाही’, असे उत्तर देण्यात आले.
संजय रेहपाडे पुढे म्हणाले, आपल्या पूर्व विदर्भात काही दिवसांपूर्वी अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर धक्कादायक वास्तव्य समोर आले. १.२ लाख रुपयांचा हॅamilton सी-३ कंपनीचा व्हेंटिलेटर २२.५० लाख रुपयांना खरेदी करण्यात आला होता. आणि ज्या निर्मल एजन्सीने हा पुरवठा केला. ती एजन्सी प्रत्यक्षात वाशिम शहरातील एक किराणा दुकान असल्याचे उघड झाले. ज्या प्रकारे अमरावतीत किराणा दुकानदारांर व्हेंटिलेटर पुरवतो, त्याच प्रकारे भंडारात कुलर आणि फर्निचर बनवणारी कंपनी ऑपरेशन थिएटर, लेबर रूम, ओटी रूमसाठी लागणारी अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रे पुरवते, हा काय प्रकार आहे. या राज्यात चाललंय काय? असा सवाल रेहपाडे यांनी उपस्थित केला.
जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाच कोटी रुपयांच्या वर खरेदी करण्याचा अधिकार नाही, तरीही हा व्यवहार झाला. टेंडर मिळाल्यानंतर प्रत्यक्षात केवळ ४ ते ५ कोटी रुपयांचे साहित्य महिला रुग्णालयाला पुरविले गेल्याचा संशय आहे. उर्वरित साहित्य कुठे आहे. याचा हिशोब नाही, असा आरोप त्यांनी केला.
भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात तीन वर्षांपूर्वी शॉर्ट सर्किटने आग लागून १० बालके दगावली होती. त्याची पुनरावृत्ती अमरावतीत झाली. निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे अशा दुर्घटना घडतात, त्यामुळे या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) ने केली आहे.
पहिला टेंडर रद्द, दुसरा स्थानिक कंपनीला
मुळात तीन वर्षांपूर्वी हे साहित्य पुरवण्यासाठी जे पहिले टेंडर काढले गेले, ते जास्त एजन्सींनी भरल्यामुळे रद्द करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्यांदा टेंडर काढण्यात आले, त्याची जाहिरात फक्त स्थानिक वृत्तपत्रातूनून देण्यात आली. प्रिया कुलर इंडस्ट्रीज, भंडारा या एजन्सीला हे टेंडर देण्यात आले. वास्तविक ही एजन्सी कुलर, फर्निचर बनविणारी व पुरविणारी आहे. तिच्याकडे वैद्यकीय उपकरणे पुरविण्याचा कोणताही अनुभव नव्हता, पाच लाख रुपयांचेही मेडिकल डिव्हाइस तिने कधी शासनाला पुरविले नव्हते. असे असताना राजकीय वरदहस्तामुळे ती केवळ टेंडर प्रक्रियेत सहभागीच झाली नाही, तर क्वालिफाय होऊन तिला साडे २८.५० कोटी रुपयांचे टेंडर मिळाले.








