दै. लोकजनच्या मुद्रणालयात शस्त्रपूजन उत्साहात
संस्थापक तथा मुख्य संपादक प्रा. एच. एच. पारधी सरांच्या हस्ते पूजा
भंडारा :- विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या पावन पर्वाचे औचित्य साधून मराठी दैनिक लोकजनच्या प्रकाशन प्रिंटिंग प्रेसमध्ये पारंपरिक शस्त्रपूजन व यंत्रपूजन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. दै. लोकजनचे संस्थापक तथा मुख्य संपादक प्रा. एच. एच. पारधी सर यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
यावेळी प्रकाशक, मालक तथा संपादक दिलीप पारधी, विजय पारधी, अंगपाल पारधी, भंडारा आवृत्ती कार्यकारी संपादक काशीनाथ ढोमणे यांची मुख्य उपस्थिती होती.
लोकजन प्रकाशनच्या छपाई यंत्रांची, संगणक प्रणालीची आणि कार्यालयीन साहित्याची पूजा करण्यात आली. प्रा. पारधी सरांनी यंत्रांना हळद-कुंकू, फुले अर्पण करून नारळ वाढविला आणि लोकजनच्या निरंतर प्रगतीसाठी प्रार्थना केली.
यावेळी बोलताना प्रा. एच. एच. पारधी सर म्हणाले, वृत्तपत्र ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. सत्य, निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेचे व्रत घेऊन लोकजनने आजवर वाटचाल केली आहे. छपाई यंत्रे ही आमच्यासाठी शस्त्रेच आहेत. या शस्त्रांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा आवाज शासनदरबारी पोहोचविण्याचे कार्य आम्ही करतो. विजयादशमीच्या या मंगलदिनी आम्ही अधिक जोमाने आणि निष्ठेने जनसेवा करण्याचा संकल्प करतो.
या पूजन सोहळ्याला लोकजन परिवारातील उपसंपादक, जाहिरात विभाग, वितरण विभाग, प्रेस ऑपरेटर आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूजेनंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून लोकजन प्रकाशनमध्ये दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजन करण्याची परंपरा जपली जात आहे. ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडणारे आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारे दैनिक म्हणून लोकजनने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या पुढील काळातही वाचकांचा विश्वास अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच दस-यापासून आँनलाईन ईपेपर मध्ये, वेबसाईट मध्ये करण्यात आलेल्या बदलाचे कौतुक केले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत सोने वाटप केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी लाला सोलंकी, सुभाष सोमनाथे, रमेश बडवाईक, सौ. ज्ञानेश्वरी बांते, सौ. टिना सोलंकी, अरूण वासनिक यांनी सहकार्य केले.









