भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; कुडेगावच्या तरुणाचा मृत्यू
परसोडी/नागजवळील घटना; धडकेनंतर ट्रॅक्टरचालक पसार
लाखांदूर : लाखांदूर-पवनी मार्गावर परसोडी/नागजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कुडेगाव येथील २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. लोमेश मधुकर राऊत असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. १८ ऑक्टोबर रविवारला लोमेश राऊत हा काही खासगी कामानिमित्त स्वतःच्या दुचाकीने लाखांदूर येथे आला होता. काम आटोपून तो सायंकाळी अंदाजे ६.३० वाजताच्या सुमारास लाखांदूर-पवनी मार्गाने कुडेगावडे परसत असताना परसोडी/नागजवळ त्याच्या दुचाकीला मागून आलेल्या भरधाव ट्रॅक्टरने धडक दिली. धडकेनंतर लोमेश गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला. दरम्यान, अपघातानंतर ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टरसह घटनास्थाळावरून पसार झाल्याची माहिती आहे.
रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडलेला तरुण प्रवाशांच्या निदर्शनास येताच त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने लाखांदूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी अवस्थेतील लोमेश याला तातडीने लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांची तपासांती त्याला मृत घोषित केले. या घटनेने कुडेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रॅक्टरचालकाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत.








