भंडारा जिल्ह्यात २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान ‘ड्राय डे’
२७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी पूर्ण होईपर्यंतही मद्यविक्री बंद
दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा:- नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीचे मतदान मुक्त, न्याय्य व निर्भय वातावरणात पार पाडावे, यासाठी भंडारा जिल्ह्यात मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी सुधारित आदेश जारी केले असून, जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेपासून २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत कोरडा दिवस (ड्राय डे) पाळण्याचे निर्देश दिले आहेत.
लोक प्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३५ (सी) अंतर्गत करण्यात आलेल्या तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. मतदानाच्या निर्धारित वेळेच्या ४८ तास आधीपासून मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकारची मद्यविक्री बंद राहणार आहे.
याशिवाय, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी पूर्ण होईपर्यंत संपूर्ण भंडारा जिल्ह्यात मद्यविक्रीवर बंदी लागू राहणार आहे. या कालावधीत देशी व विदेशी मद्यविक्रीसह संबंधित सर्व अनुज्ञीधारकांना आपली दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ड्राय डेच्या आदेशाचे उल्लंघन करून अवैध मद्यविक्री केल्याचे आढळल्यास संबंधित अनुज्ञीधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासह त्याची अनुज्ञी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व पथकांना या कालावधीत विशेष गस्त घालण्याचे तसेच अवैध मद्यविक्रीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि नियमांचे पालन करून पार पाडण्यासाठी नागरिकांनी तसेच मद्यविक्री अनुज्ञीधारकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








