जमिनीच्या वादाला गुन्हेगारी वळण; जैन कुटुंबांकडून मकोकाची मागणी
💥 कथित अतिक्रमणचा प्रयत्न 💥 अनिकेत जैन यांना मारहाणीचा आरोप 💥 कुटुंबांनी मागितले पोलिस संरक्षण
दै. लोकजन वृत्तसेवा
आमगाव:- गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे गट क्र. क्रमांक ४६०-अ मधील जमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादाला आता गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. या जमिनीवर कथितरीत्या बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न, सीमांकानाचे सिमेंट पोल तोडने आणि दशहत निर्माण केल्याचा आरोप संतोष धूलचंद जैन व कुटुंबांनी केला आहे. याच प्रकरणात २१ ऑगस्ट रोजी अनिकेत जैन यांना काही व्यक्तींनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून, संबंधिताविरुद्ध आमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जैन कुटुंबांच्या दाव्यानुसार गट क्रमांक ४६०-अची एकूण आराजी चार हेक्टर असून, त्यापैकी एक हेक्टर जमीन पूर्वी विक्री करण्यात आली आहे. उर्वरित तीन हेक्टर जमिनीवर आपला मालकी हक्क असल्याचे त्यांनी सांगितले. या दाव्याच्या समर्थनार्थ शासकीय अभिलेख, मोजणी कागदपत्रे, नकाशे, ‘क’ प्रत आणि विक्री दस्त उपलब्ध असल्याचे कुटुंबांचे म्हणणे आहे.
दरम्यान, लगतच्या गट क्रमांक ४९९च्या अकृषक परवानगी प्रक्रियेत सादर करण्यात आलेल्या काही नकाशांमध्ये गट क्र. ४६०-अमधून रस्ता दर्शविल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेमोर चुकीची माहिती सादर झाली का, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
२१ ऑगस्टला पुन्हा तणाव
कुटुंबांच्या म्हणण्यानुसार, जमिनीचे सीमांकन करून सिमेंट पोल उभारण्यात आले होते. मात्र, काही व्यक्तींनी ते तोडून रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. २१ ऑगस्टला पुन्हा अशाच प्रकारे ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात आल्यानंतर अनिकेत जैन घटनास्थलगी गेले. त्यावेळ्री त्यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी आमगाव पोलिस ठाण्यात रक्षक क्र. ०५५२ नोंदविण्यात आला असून, विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कुटुंबांनी सांगितले.
‘पोलिस स्टिक’चा मुद्दाही ऐरणीवर
मारहाणीत कथितरीत्या पोलिसांकडील लाठीसृदृश ‘पोलिस स्टिक’ वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही वस्तू पोलिस विभागाची अधिकृत सामग्री असल्यास ती संबंधितांच्या हाती कशी पोहोचली, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. कथित घटनांची मालिका, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि संघटित स्वरूप तपासून संबंधिताविरुद्ध मकोका कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी जैन कुटुंबांनी केली आहे. तसेच कुटुंबाला पोलिस संरक्षण देऊन कोणत्याही राजकीय दबावाविना निष्पक्ष चौकशी करावी, अशीही मागणी आहे.
मालकी हक्क, नकाशे, कथित अतिक्रमणाचा प्रयत्न आणि पोलिस स्टिकच्या वापराबद्दलची वस्तुस्थिती पोलिस व प्रशासकीय चौकशीतून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता प्रशासन कोणत्या गांभीर्याने पाहते, याकडे लक्ष लागले आहे.








