धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्या – खा. प्रफुल्ल पटेल
दे. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- नागपूर विभागातील किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सर्व शासकीय व सहकारी धान खरेदी केंद्रांच्या अडचणीबाबत व सीएमआर भरडाई व साठवणूक तसेच शेतकऱ्यांच्या समस्या व विविध विषयांवर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालय, मुंबई येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपस्थित खासदार प्रफुल्ल पटेल यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याची मागणी केली.
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी गोंदिया – भंडारा जिल्ह्यातील संकटात सापडलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला आहे. धनाला बोनस देण्याबाबत विधानसभा अधिवेशनात सुद्धा शासनाच्या वतीने आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना बोनस मिळावा याकरिता या विभागातील सर्व लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री यांना भेटून बोनस करिता आग्रह करू असे खा. प्रफुल्ल पटेल म्हणो. ते पुढे म्हणाले, दिवाळी पूर्वी शासकीय धान खरेदी केंद्र त्वरित सुरु करून भरडाई केलेल्या शेतकऱ्यांच्या धानांची उचल करावी. शेतकऱ्यांची ई पीक नोंदणी करून धान खरेदीला अडचण येणार नाही यासाठी यंत्रणेने सतर्कतेने काम करावे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास मंडळ द्वारा खरेदी केलेल्या २००१ ते २०१४ पर्यंतचे प्रलंबित कमिशन त्वरित देण्यात यावे. शासकीय धान खरेदी केंद्र तसेच धान खरेदी करणाऱ्या संस्थांच्या तांत्रिक व भौतिक अडचणी यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी चर्चा केली.
या बैठकीला खासदार राजेंद्र जैन यांनी ऑनलाइन हजर होऊन मंत्री महोदयांना निदर्शनास आणले की, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ त्वरित देण्यात यावा अशी मागणी यावेळी केली. तसेच BEAM पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांची नोंदणी केली जाते. परंतु, सदर पोर्टल बंद असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सदर पोर्टल सुरू करण्यात यावे. तसेच साठवणूक करिता गोदामांची क्षमता कमी असल्याने ७० टक्के धान उघड्यावर राहते त्यामुळे गोदामांची संख्या वाढविण्यात यावी तसेच गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र त्वरित चालू करण्याची संबंधी चर्चा केली. यावेळी आमदार राजकुमार बडोले, आमदार राजभाऊ कारेमोरे व विदर्भातील जनप्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.








