शिक्षकांची कमतरता असताना घड्याळी तासिका शिक्षक बंद करणे विद्यार्थीविरोधी
निर्णय तातडीचे रद्द करा – एआयएसएफचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
दे. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- जिल्ह्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आधीच शिक्षकांची मोठी कमतरता असताना उपलब्ध असलेले घड्याळी तासिका तत्वावरील शिक्षक बंद करण्याचा जिल्हा परिषदेचा निर्णय तातडीपूर्वक रद्द करावा, अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ) भंडारा जिल्हा कौन्सिलने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे अध्यापन सुरळीत राहावे यासाठी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत घड्याळी तासिका तत्वावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, शिक्षणाधिकारी कार्यालयाने २४ सप्टेंबर २०२६ रोजी काढलेल्या पत्राद्वारे २५ सप्टेंबरपासून अशा शिक्षकांना कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. शिक्षकांची कमतरता असताना उपलब्ध शिक्षकही बंद करण्याचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळ करणारा असल्याची टीका एआयएसएफने केली आहे.
भंडारा जिल्ह्यात सुमारे ३२ हायस्कूल आणि २२ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विषयवार शिक्षक उपलब्ध नसताना घड्याळी तासिका शिक्षकांची सेवाही बंद केल्यास विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन, अभ्यासक्रम पूर्ण करणे, शंका निरसन, सराव परीक्षा आणि बोर्ड परीक्षेची तयारी यावर गंभीर परिणाम होणार आहे.
विशेषतः इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना शिक्षक कमी करण्याचा निर्णय अधिकच गंभीर आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक शिक्षक उपलब्ध करून देण्याऐवजी प्रशासनाने उपलब्ध शिक्षकही कमी करणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कावर घाला घालणे आहे. प्रशासकीय अथवा न्याययीन बाबींचे कारण पुढे करून त्याची किंमत विद्यार्थ्यांना मोजायला लावण योग्य नाही. शिक्षण व्यवस्था सुरळीत ठेवणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी असून त्यासाठी विद्यार्थ्यांचे अध्यापन थांबविणे हा कोणताही उपाय होऊ शकत नाही, असे एआयएसएफने स्पष्ट केले आहे.
कायमस्वरूपी शिक्षक नियुक्त होईपर्यंत तात्पुरत्या अथवा घड्याळी तासिका शिक्षकांच्या माध्यमातून अध्यापन व्यवस्था सुरू ठेवावी. शिक्षकांची कमतरता असताना उपलब्ध शिक्षकही कमी करण्याचा निर्णय स्वीकारणार नाही. प्रशासनाने सदर निर्णय तात्काळ मागे घेऊन विद्यार्थ्यांना पुरेसे शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास तीन दिवसानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एआयएसएफने दिला आहे.
यावेळी एआयएसएफचे राज्याध्यक्ष वैभव चोपकर, जयश्री खांडकरे, आफताब कुरेशी, आदित्य वंजारी, ओम हातझाडे यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.








