लोकाशाहीवरील हल्ल्याच्या निषेधार्थ भंडारात काँग्रेसचा ‘ब्लैक डे’
राहुल गांधी यांच्यासह एनडीए आघाडीच्या नेत्यांच्या आंदोलनावरील कारवाईचा निषेध
दे. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार ८ ऑक्टोबर हा ‘ब्लैक डे फॉर इंडियन डेमोक्रसी’ म्हणून पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी, भंडारा शहर काँग्रेस कमिटी व भंडारा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज गांधी चौक, भंडारा येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत तसेच एसआयआर संदर्भातील प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांच्या नेतृखालील एनडीए आघाडीच्या खासदारांनी ६ व ७ ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये आंदोलन केले. ७ ऑक्टोबर रोजी जंतर-मंतरकडे जात असताना राहुल गांधी, प्रियंका गांधी व इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची नोंद आहे. या कारवाईवर काँग्रेसने तीव्र आक्षेप नोंदवला.
या पार्श्वभूमीवर भंडारा येथे झालेल्या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला.
यावेळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी सांगितले की, ‘लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक प्रक्रिया, मतदार यादी आणि संवैधानिक संस्थांच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार विरोधी पक्षांना आहे. राहुल गांधी आणि एनडीए आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर पारदर्शकपणे उत्तर मिळणे आवश्यक आहे. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणाऱ्या आवाजाला दडपण्याऐवजी त्या प्रश्नावर चर्चा होणे गरजेचे आहे.’
यावेळी शहर अध्यक्ष धनराज साठवणे यांनी सांगितले, ‘विरोधी पक्षांच्या आंदोलनाकडे केवळ राजकीय संघर्ष म्हणून न पाहता त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे मतदार यादी, डखठ आणि निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर पारदर्शकता आणि स्पष्टता असणे आवश्यक आहे.’
या आंदोलनास मुकुंद साखरकर, जिया पटेल, धनराज साठवणे, अभिजोत वंजारी, रिजवान काशी, राजकपूर राऊत, मनोज वागडे, वैभव मेंढे, नरेंद्र साकोरे, किशोर राऊत, नवाब पटेल, हिरामण लांजेवार, आयुब पटेल, शमीम शेख, इम्रान पटेल, शीलवंत मडामे, जीवन कावडे, सुरेश कोटेखावे, फारुख खान, भाऊ कातोरे, सुरेश गुंभाडे, प्रमोद मानापुरे, पवन बंजारी, विनीत देशपांडे, मधुकुर कुंभाडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








