नवोरात्रोत्सवात मंदिर व गरबा मंडळांनी नियमांचे पालन करावे
विश्व हिंदू परिषद, मातृशक्ती व बजरंग दलाचे पत्रकार परिषदेत आवाहन
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- दि. ११ ऑक्टोबरपासून अश्विन नवरात्र सुरु होत आहे. हिंदू धर्मात शक्ती उपासनेचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भंडारा शहरात सुमारे आठ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गरबा व दुर्गा उत्सव मंडळांचे आयोजन केले जाते, या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद, मातृशक्ती संघटना व बजरंग दलाच्या वतीने ऑफिस क्लब भंडारा येथे संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली.
या पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरवार, उपाध्यक्ष भरत मल्होत्रा, जिल्हा महामंत्री डॉ. राकेश सेलोकर, धर्म प्रचारक संजय शर्मा, मातृशक्तीच्या भूमिका साकुरे, ममता दलाल, बजरंग दलाचे जयेश क्षीरसागर उपस्थित होते.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, नवरात्र उत्सवाला हिंदू सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे. मात्र काही ठिकाणी गरबा मंडळांकडून विदेशी संस्कृतीचे अनुकरण, परंपरा व पूजा पद्धतीत विकृती दाखविली जात असून धर्मांतरासारखे प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला.
जिल्ह्यात मागील वर्षी लव्ह जिहादची २२ प्रकरणे
विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दावा केला की, भंडारा जिल्ह्यात मागील वर्षी लव्ह जिहादची २२ प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यापैकी सर्वाधिक प्रकरणे ही गरबा मंडळातील ओळखीतून घडल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे यंदा अधिक सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
मागील वर्षी जिल्ह्यात लव्ह जिहादची २२ प्रकरणे उघडकीस आली असून त्यातील बहुतांश प्रकार गरबा मंडळातून घडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मंदिर ट्रस्ट व गरबा आयोजकांनी काही नियमांचे पालन करावे, अशा सूचना विहिपर्तर्फे करण्यात आल्या.
गरबा्यात येणाऱ्या मुलींचे फोटो काढून इंस्टाग्राम, फेसबुकवर टाकणे व घरी सोडण्याचे आमिष दाखवून गैरप्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही ब्युटी पार्लरमधूनही मुलींचे मोबाईल नंबर बाहेर जात असल्याचे सांगत याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहनही पत्रकार परिषदेत करण्यात आले. कोणतीही अनुचित घटना घडल्यास वेळीच कारवाई करावी, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
मंडळांनी या नियमांचे पालन करावे
हिंदू धर्मावर आस्था न ठेवणाऱ्या विधर्मी व्यक्तींना गरबात किंवा मंदिरात प्रवेश देऊ नये.
गरबा मंडपात नशा वा नशिल पदार्थ सेवन होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आढळल्यास तात्काळ कारवाई करावी.
प्रवेशवेळी पुरुष व महिलांकडून ओळखपत्र किंवा आधार कार्ड तपासावे.
मंडपात केवळ हिंदू धर्माची पारंपरिक गीते, भक्तीगीते व पारंपरिक वाद्यांसह नृत्य व जागरणाचे आयोजन करावे.
एक दिवस भारतातील महान वीरांगना, ऐतिहासिक स्त्रिया व देवीच्या शक्ती स्वरूपावर कार्यक्रम सादर करावा.
मातृशक्ती व युवतींच्या वतीने शस्त्रपूजनाचे आयोजन करावे.
पालकांनी सजग राहावे
आपली मुलगी गरबायाला किती वाजता जाते, कोणासोबत जाते, कोणत्या मंडळात जाते आणि घरी किती वाजता परत येते याची नोंद ठेवा.
गरबायाच्या निमित्ताने नव्याने ओळख झालेल्या मित्र-मैत्रिणींची माहिती घ्या. घरी सोडतो असे सांगून दुचाकीवरून एकांतात नेण्याच्या प्रकारांना बळी पडू नये म्हणून आधीच समज द्या.
गरबायातील सुंदर फोटो / व्हिडिओ काढून इंस्टाग्राम, फेसबुकवर टाकून नंतर ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढले आहेत. असे फोटो काढून देऊ नका व अनोळखी व्यक्तीला फोटो शेअर करू नका.
कोणताही अनुचित प्रकार किंवा जबरदस्ती आढळल्यास आयोजक, विहिप, मातृशक्ती किंवा पोलिसांशी संपर्क साधा.








