तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा, बोनस व कर्जमाफीसाठी आंदोलन
हरदोली (सि) येथे रास्ता रोको चा प्रयत्न; आंदोलकांची अटक व सुटका
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- तुमसर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे, धान उत्पादकांना बोनस व कर्जमाफी देण्यात यावी याच्या मागणीच्या पूर्ततेसाठी आज ७ ऑक्टोबर रोजी तुमसर दपेरा राज्य मार्गावरील हरदोली (सि) येथे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व पंचायत समिती तुमसरचे माजी उपसभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरचे संचालक अ. कलाम शेख व जिल्हा परिषद उपाध्यक्ष रमेश पारधी यांनी केले. आंदोलन स्थळी तुमसरचे नायब तहसिलदार जांभुलकर यांनी भेट देऊन तुमसर व मोहाडी तालुका २९ सप्टेंबर रोजी मंत्रीमंडळात झालेल्या बैठकीत दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे सांगितले.
आंदोलन स्थळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या व्यथा मांडल्या. धान उत्पादक शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. धान पिकावर मावा, तुळतुळा, करपा आणि खोडकिडा सारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले तर हलक्या धान पिकांवरील रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होण्याची प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेता दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत तुमसर व मोहाडी तालुक्याचा समावेश करण्यात यावा अशी मागणी उचलून धरण्यात आली होती.
धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. कर्जबाजारी शेतकऱ्यांना जाहीर केल्या प्रमाणे २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्ज माफी देण्यात यावी व नियमित कर्ज परत फेड करणाऱ्या शेतक-यांना जाहीर करण्यात आलेली ५० हजार रुपयांची प्रोत्साहन राशी देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांचे संकट केवळ पिकांच्या नुकसानी पुरते मर्यादित नसून त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक नियोजनावर, कर्ज परत फे डीवर आणि आगामी हंगामाच्या तयारीवर सुद्धा होत असल्याचे रमेश पारधी यांनी आपल्या भाषणात सांगितले.तर आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष मदत, नुकसान भरपाई संदर्भातील निर्णय आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर कालबद्ध कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे अ. कलाम यांनी आपल्या भाषणात सांगितले.
शासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी होऊ लागली तर २९ सप्टे बर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुमसर व मोहाडी तालुका दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे नायब तहसिलदार जांभुलकर यांनी सांगितले. रास्ता रोको करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना लगेच सिहोरा पोलिसांनी ताब्यात घेतले.
या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष रमेश पारधी, माजी उपसभापती तथा संचालक अ. कलाम शेख, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र ढवाले, माजी जिल्हा परिषद सदस्य, राजेश पटले, माजी सरपंच उमेश कटरे, लखन मोरे, बन्सी नागपुरे, गणेश सिंधपुरे, अभय शुक्ला, कंचन कटरे, प्रवीण मिश्रा, वामन सिंगनजुळे, शैलेश मिश्रा, त्रिनंद कटरे, सुखदेव राऊत, छगन पारधी, देवेंद्र मेश्राम, कृष्णा बनकर, प्रल्हाद आगासे, सद्दाम शेख, राजेंद्र बघिले व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








