ढिवरवाडा येथील शेतकरी दोन दिवसांपासून बेपत्ता
नदीकाठावर दुपट्टा, चप्पल आणि दोराचे तुकडे आढळले; शोधकार्याला दिरंगाई
दै. लोकजन वृत्तसेवा
करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील ढिवरवाडा येथील शेतकरी अमरकंठ सहादेव वनवे, (वय ५२) हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाले असून त्यांच्या बेपत्ता होण्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
काल सोमवारी सकाळी अमरकंठ वनवे हे नेहमीप्रमाणे शेतावर गेले होते. मात्र सायंकाळ झाली तरी ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी शेत परिसर व बाजूबाजूच्या भागात रात्रभर शोधामोशोध केली, पण काहीच ठाнгपत्ता लागला नाही. अखेर रात्री करडी पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. लोकांची पावले थेट वैनगंगा नदीकडे वळली. नदीकाठावर शोध घेत असताना तिथे एक दुपट्टा, एक जोड चप्पल आणि दोन दोराचे तुकडे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले की घातपात झाला, अशी शंका व्यक्त केली जात आहे. याची माहिती तात्काळ करडी पोलिसांना देण्यात आली.
गावकऱ्यांनी स्वतः डोंगुली (होडी) टाकून नदीमध्ये शोध सुरू केला, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोध लागला नाही. याबाबत भंडारा जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाला माहिती देऊनही प्रशासनाने तासन्तास दिरंगाई केली. दुपारी ३ वाजेच्या दरम्यान बचाव पथक आले व शोध सुरू केला, पण अंधार होईपर्यंत शेतकऱ्याचा शोध लागलेला नाही.
दोन दिवसांपासून अमरकंठ वनवे बेपत्ता असताना प्रशासन सुस्त आहे. जर वेळेवर यंत्रणा पोहोचली असती तर कदाचित शोध लागला असता. प्रशासनाच्या या हलगर्जीपणाणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रशासनाला जाग येणार का?
एका शेतकऱ्याच्या जीवाचा प्रश्न असताना आपत्ती व्यवस्थापन टीमला पोहोचायला अर्धा दिवस लागतो, ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन शोध मोहीम तीव्र करावी, अशी मागणी रूपेश ठवकर ढिवरवाडा वासीयांकडून होत आहे.








