अखेर तिसऱ्या दिवशी शेतकरी अमरकंठ वनवे याचा मृतदेह नदीत तरंगताना आढळून आला
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- ढिवरवाडा येथील बेपत्ता शेतकरी अमरकंठ सहादेव वनवे (वय ५२) याचा मृतदेह तिसऱ्या दिवशी वैनगंगा नदीच्या काठावर पाण्यात तरंगताना आढळून आला.
अमरकंठ वनवे हे सोमवारी सकाळी शेतावर गवत आणायला गेला असता घरी परतलेच नाहीत. कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी नदीकाठावर दुपट्टा, चप्पल आणि दोन दोराचे तुकडे आढळून आले होते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन टीमला पाचारण करून शोध घेण्यात आला, परंतु शोध लागला नव्हता.
अखेर आज तिसऱ्या दिवशी गावकरी पुन्हा नदी घाटावर गेले असता त्याच ठिकाणी अमरकंठ वनवे यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. घटनेची माहिती मिळताच करडी पोलिसांनी घटनास्थळ गाठले.
करडी पोलिस ठाण्याचे पथकाने मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला. पुढील तपासासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. नदीकाठावर आढळलेले दोराचे तुकडे आणि दुपट्टा यामुळे या घटनेला वेगळे वळण मिळाले होते. दुपारी ढिवरवाडा येथील नदी घाटावर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.
करडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार गौरनाथ नागलोट यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मुलचंद मेश्राम करीत आहेत.








