भंडारा शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची त्वरित दुरुस्ती करा; अन्यथा आंदोलन
शिवसेना (उ.बा.ठा.) चे जिल्हाधिकारी यांना निवेदन
दे. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- मागील तीन-चार वर्षांपासून भंडारा शहरातील विकासाच्या नावावर खोदलेले रस्ते हे पक्क्या स्वरूपात दुरुस्ती न केल्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य तयार होऊनही न. प. भंडाराचे प्रशासन, पदाधिकारी हे दुर्लक्ष करीत असून याचा प्रचंड मानसिक त्रास हा शहरातील नागरिकांना होत असल्यामुळे आठवडाभरात रस्त्यांवर पडलेले खड्डे कायमस्वरूपी बुजविण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे या निवेदनातून करण्यात येत आहे.
भंडारा शहरातील राजीव गांधी चौक ते पांडे महाल, राजीव गांधी चौक ते मुस्लिम लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक ते खात रोड ला जोडणारी ट्युशन गल्ली, अण्णाभाऊ साठे चौक ते शितला माता मंदीर रोड, अशा प्रमुख रस्त्यावर मोठेमोठे खड्डे गेल्या अनेक वर्षापासून पडलेले आहेत. यापूर्वी या खड्ड्यांची गिट्टी, चुरी टाकून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविले गेलेत. परंतु दोन महिने उलटल्यानंतर परिस्थिती अजून जैसे थेच झालेली असून अनेक दुचाकी स्वार रस्त्यावरून दुचाकी चालवताना खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात करून बसतात. गिट्टीवरून मोटरसायकल स्लिप होतात. त्यातून अनेकांना अपंगत्व सुद्धा आलेले आहे. तर अनेकांना अस्थिरोगांना सामोरे जावे लागले. या खड्ड्यांमुळे आणि रस्त्यावरील धुळीमुळे शहरातील नागरिकांमध्ये मक्याचे आणि श्वसनाच्या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. परंतु निवडणुकीमध्ये भंडाराकरांना मोठेमोठे स्वप्ने दाखवून, खोटी आश्वासन देऊन जे निवडून आलेत त्यांना सुद्धा या बाबी दिसू नयेत हे शहरातील नागरिकांचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.
ज्या विकासाच्या नावावर शहरातील चांगल्या रस्त्यांची वाट लावली तो विकास तर अजूनही झोप्यातच डल्ला आहे. चार वर्षांपासून हा विकास जनतेच्या नजरेसमोर आलाच नाही. शहरातील राजीव गांधी चौकापासून खात रोडकडे जाणाऱ्या ट्युशन गल्लीमध्ये तर चारचार फूट लांब आणि एका फुताहून खोल खड्डे पडलेले असले तरी झोपी गेलेल्या न.प.च्या अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना याची जरा ही लाज नाही. नागरिकांकडून कर मात्र नियमितपणे वसुली केली जाते.
न.प. प्रशासनाने शहरातील नागरिकांच्या संयमाचा अंत पाहाू नये आणि आठवडाभरात नमूद केलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा शिवसेना (उ. बा. ठा.) नागरिकांच्या हितासाठी आंदोलन करण्यास बाध्य राहील याची प्रशासनाने नोंद घ्यावी असा इशारा शिवसेना (उ. बा. ठा.) पक्षातर्फे शहर प्रमुख राकेश आग्रो, शहर संघटक प्रशांत देशमूक, मयूर जोशी, उपशहर प्रमुख प्रकाश गभणे, राजेश ठक्कर, प्रकाश निनाबे, अनिरुद्ध गाढवे, सोमेस्वर सेलोकर, हिमांशू भाजीपाले, शामराव मालखंडाळे, संतोष चांदीदार, नितेश गभणे, अथर्व समर्थ, मोनू हेडाऊ, रोशन मेश्राम इत्यादींनी दिला आहे. सदर निवेदनाची प्रतिलिपी न.प. मुख्याधिकारी भंडारा यांना सुद्धा दिलेली आहे.








