धोप येथील शेतकरी राजेंद्र सपाटे यांची आत्महत्या

चार दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांकडे व्यथा मांडल्यानंतरही टोकाचे पाऊल

दे. लोकजन वृत्तसेवा

मोहाडी :- मौजा धोप, ता. मोहाडी, जि. भंडारा येथील शेतकरी राजेंद्र अमर सपाटे (वय ५२) यांनी आज दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान स्वतःच्या शेताजवळील श्रीमती उरुडीबाई यशवंत सपाटे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विशेष बाब म्हणजे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नुकताच धोप परिसराचा दौरा केला होता. त्यावेळी राजेंद्र सपाटे यांनी स्वतः पुढे येऊन आपली व्यथा व शेतकऱ्यांच्या अडचणी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने कोणती कार्यवाही केली, याची माहिती समोर आलेली नाही. त्याच शेतकऱ्याने आज जीवन संपवल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

मृतक राजेंद्र सपाटे यांच्या नावाने वैयक्तिक शेतजमीन १.८२ हे. आर. व सामूहिक शेतजमीन ०.१९ हे. आर. आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नी, एक २१ वर्षीय मुलगी व १९ वर्षीय मुलगा आहे. दोघेही बाहेरगावी शिक्षण घेत आहेत. त्यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था धोप येथून १ लाख १८ हजार रुपयाचे पीक कर्ज घेतलेले होते.

शेतकऱ्याने अडचणी सांगूनही त्याकडे वेळेस गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार चरण वाघमारे यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून शासनाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. वाघमारे यांनी म्हटले आहे कि, शासनाने राजेंद्र सपाटे यांच्या आत्महत्येची तात्काळ दखल घेऊन कुटुंबियांना शासकीय मदत व आधार द्यावा. त्यांनी आत्महत्येपूर्वी मांडलेल्या तक्रारी व मागण्यांची चौकशी करावी. त्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने कोणती कार्यवाही केली याचा अहवाल जनतेसमोर ठेवावा. तसेच मोहाडी-तुमसर परिसरातील संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय घ्यावा.

शेतकऱ्याचा आवाज त्याच्या जीवनाकी किंमत मोजल्यानंतर ऐकला जाणार असेल तर ही संपूर्ण व्यवस्थेसाठी चिंतेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या घटनेच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *