अंधश्रद्धेला थारा नको; वैज्ञानिक दृष्टिकोण स्वीकारा : राहुल डोंगरे

बामनी येथील अघोरी पूजेच्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन

दै. लोकजन वृत्तसेवा

तुमसर :- विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात समाजाने प्रगतीची मोठी झेप घेतली असतानाही अंधश्रद्धा, जादुटोणा, करनी, भनामती आणि अघोरी पूजेसारख्या प्रकारांना काही ठिकाणी मिळणारे स्थान ही चिंतेची बाब आहे. नुकतेच बामनी गावातील मुख्य चौकात जादुटोणा व अघोरी पूजेसदृश प्रकार आढळल्याची बातमी प्रसिद्ध झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता प्रत्येक घटनाकडे विवेकबुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहावे, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तुमसर तालुका संघटक राहुल डोंगरे यांनी केले आहे.

रस्त्यावर लिंबू, कुंकू, रांगोळी, बाहुली किंवा अन्य वस्तू आढळल्या म्हणून त्याला तात्काळ जादुटोणा, करनी अथवा भूतबाधेचे स्वरूप देणे योग्य नाही. अशा घटनांमागे अनेकदा मानवी हस्तक्षेप, सामाजिक गैरसमज किंवा साध्या नैसर्गिक कारणांचा संबंध असू शकतो. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता ‘प्रश्न विचारா, कारण शोधा आणि सत्य पडताळा’ ही भूमिका समाजाने स्वीकारणे गरजेचे आहे.

राहुल डोंगरे म्हणाले, ‘श्रद्धा ही वैयक्तिक बाब आहे; मात्र श्रद्धेच्या नावाखाली भीती निर्माण करणे, लोकांची आर्थिक फसवणूक करणे, मानसिक त्रास देणे किंवा अमानुष कृत्य करणे स्वीकारता येणार नाही. अंधश्रद्धेविरोधातील लढा हा कोणत्याही धर्माविरोधात नसून अज्ञान, शोषण आणि भीतीविरोधातील लढा आहे.’

महाराष्ट्रात मानवी बळी, अमानुष व अघोरी प्रथा आणि जादुटोणा रोखण्यासाठी २०१३ चा कायदा अस्तित्वात आहे. या कायद्याचा उद्देश समाजात जनजागृती निर्माण करून अशा घातक प्रथांपासून सामान्य नागरिकांचे संरक्षण करणे हा आहे.

‘अंधश्रद्धा घटना दिल्यास त्याची अफवा पसरविण्याऐवजी पोलिस प्रशासनाची मदत घ्यावी. मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा, गावोगावी जनजागृती, प्रबोधन आणि प्रयोगांच्या माध्यमातून अंधश्रद्धेचे वास्तव समोर आणण्यासाठी समिती प्रयत्नशील राहील,’ असेही राहुल डोंगरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *